रुग्णालयाच्या खाटेवरूनच तुपकरांची गर्जना; “शेतकऱ्यांचा उद्रेक रोखायचा असेल तर निर्णय घ्या!”
“…तर मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेन; एकदा बसल्यावर उठणार नाही!” – रविकांत तुपकर
बुलढाणा (प्रतिनिधी): “अन्नत्याग आंदोलन स्थगित करतेवेळी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचा शब्द दिला होता. हवे तर आणखी चार-पाच दिवसांचा वेळ घ्या, मात्र सरकारसोबत बैठक लावून कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या. सरकारने जर दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल. महाराष्ट्रभरातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल. मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेन. एकदा बसल्यावर उठणार नाही. या आंदोलनातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची असेल,” असा खणखणीत इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी दिला आहे.
अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावलेल्या रविकांत तुपकर यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील खाटेवरूनच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारला ठणकावून इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह पीकविमा आणि अन्य २३ मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाण्यातील त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला सरकारने या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते. मात्र दिवसागणिक तुपकर यांची प्रकृती खालावत गेली आणि त्याचवेळी राज्यभरातील शेतकऱ्यांचा संतापही उफाळून आला होता.
अनेक ठिकाणी आंदोलनांना आक्रमक वळण लागले. एसटी बस जाळण्यापासून ते सरकारी कार्यालयांवर हल्ले, आत्मदहनाचे प्रयत्न, जाळपोळ, तलाठी कार्यालये आणि शासकीय वाहनांची तोडफोड अशा घटनांनी प्रशासन हादरून गेले होते. राज्यातील ग्रामीण भागात असंतोषाचा जणू स्फोटच झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच अखेर सरकार झुकले.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत तुपकर यांच्याशी चर्चा केली. कर्जमाफीसंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि सरकारला संधी देण्याच्या भूमिकेतून तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.
मात्र त्या आंदोलनाची किंमत तुपकर यांना स्वतःच्या प्रकृतीने चुकवावी लागली. अन्नत्यागामुळे त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी धोकादायकरीत्या घसरली होती. शरीरातील किटोनचे प्रमाण वाढले होते. तसेच किडनीवर परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी सरकारने दिलेला शब्द विसरू नये, अशी आठवण त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच करून दिली आहे.
“शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर यावेळी संघर्ष अधिक तीव्र होईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यभरातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल,” असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
दरम्यान, तुपकर यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील शेतकरी आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून कर्जमाफी, पीकविमा आणि इतर मागण्यांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे





