अकोला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची धडाकेबाज कामगिरी; गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे स्थानकातून शोध
श्रीकांत पाचकवडे
अकोला : तब्बल दोन वर्षांपासून बालकल्याण समितीच्या ताब्यातून फरार असलेल्या बालकाचा शोध लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU), अकोला यांना मोठे यश मिळाले आहे. अनेक जिल्ह्यांत शोधमोहीम राबवूनही हाती न लागलेल्या या बालकाला अखेर अकोला रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे पोलिसांच्या चिकाटीला आणि तपास कौशल्याला पुन्हा एकदा यशाची किनार लाभली आहे.
पोलीस स्टेशन अकोट फैल येथे दाखल असलेल्या अपराध क्रमांक ५५३/२०२४, कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पथकाने भुसावळ, जळगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, शेगाव आदी ठिकाणी वारंवार शोधमोहीम राबवली. मात्र बालकाचा कोणताही मागमूस लागत नव्हता.
दरम्यान, संबंधित बालक अकोला रेल्वे स्थानक परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापळा रचला. रेल्वे स्थानकावरील बाथरूम परिसरात संशयास्पद हालचाली करणारा एक मुलगा आढळून आला. त्याची ओळख पटवून चौकशी करण्यात आली असता तोच दोन वर्षांपासून शोधात असलेला बालक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षित ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात आणले व नंतर बालकल्याण समिती, अकोला यांच्या स्वाधीन केले.
महिला व बालकांवरील अत्याचार तसेच बेपत्ता बालकांच्या शोधासाठी अकोला पोलीस दल सातत्याने कार्यरत असून, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आतापर्यंत तब्बल १३५ गुन्हे उघडकीस आणून अनेक पीडितांना न्याय मिळवून दिला आहे.
ही यशस्वी कारवाई सपोनि कविता फुसे, सपोनि चंद्रकला मेसरे, महिला पोलीस हवालदार अनिता टेकाम, पूनम बचे, पोलीस हवालदार प्रदीप उंबरकर, विशाल मोरे आणि वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल भागवत काळे यांच्या अथक परिश्रमातून पार पडली.
बालकाचा सुरक्षित शोध; पोलिसांच्या संवेदनशीलतेची पुन्हा प्रचिती
दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या बालकाचा सुखरूप शोध लावून त्याला पुन्हा बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आल्याने संबंधित यंत्रणांनी समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईमुळे अकोला पोलिसांची सतर्कता, संवेदनशीलता आणि बालसुरक्षेबाबतची बांधिलकी अधोरेखित झाली असून, बेपत्ता बालकांच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.





