श्रीकांत पाचकवडे / Akola
अकोला : अकोला तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांविरुद्ध तहसील प्रशासनाने कडक भूमिका घेत धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने विविध ठिकाणी छापेमारी करून अवैधरित्या मुरुम व वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त केली आहेत. संबंधित वाहनचालक व मालकांवर लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच फौजदारी कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.
अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात ट्रक जप्त; २.४७ लाखांचा दंड
दि. २१ जून २०२६ रोजी अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात महसूल पथकाने धाड टाकून WB-15-C-2481 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेतला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये सुमारे ३ ब्रास मुरुम आढळून आला.
या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत २ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच चालक धनराज उत्तमराव तायडे व वाहनमालक विजय भीमराव तायडे (रा. बोरगाव मंजू, ता. जि. अकोला) यांनी विनापरवाना गौण खनिज वाहतूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एकलारा शिवारात ट्रॅक्टरवर कारवाई; वाळू वाहतुकीप्रकरणी गुन्हा
यापूर्वी दि. १७ मे २०२६ रोजी मौजे एकलारा शिवारात महसूल पथकाने कारवाई करत JZCSK135659653 चेसीस क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला होता. सदर वाहनातून १ ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी १ लाख ३४ हजार १०० रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महसूल अधिकाऱ्यांची चाहूल लागताच चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. त्यामुळे शासकीय महसूल बुडविणे आणि अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध उत्खनन करणाऱ्यांना तहसील प्रशासनाचा स्पष्ट इशारा
अकोला तालुक्यात कुठेही विनापरवाना वाळू, मुरुम किंवा इतर गौण खनिजांचे उत्खनन अथवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कोणतीही दया दाखविण्यात येणार नसल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकरणांमध्ये वाहने जप्त करून थेट पोलीस गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.
महसूल विभागाची ही विशेष मोहीम आगामी काळात अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याने अवैध गौण खनिज व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.






