३ आरोपी अटकेत; ९.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा
श्रीकांत पाचकवडे / अकोला
गोवंश चोरी आणि तस्करीविरोधात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. खदान, चान्नी आणि अकोट फाईल पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन चारचाकी वाहने, मोबाईल, रोख रक्कम आणि गोवंश असा सुमारे ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरीच्या घटनांचा छडा
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी दोन पथके तयार करून गोवंश चोरीच्या घटनांचा समांतर तपास सुरू केला. खदान पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १४८९/२०२६ आणि चान्नी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ या प्रकरणांच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
दोन्ही घटनांमध्ये एकाच वाहनाचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी मिर्झा शोएब बेग मिर्झा अझहर बेग (वय २६, रा. सोळाशे प्लॉट, अकोट फाईल, अकोला) याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून होंडा अमेझ कार (MH-49-F-1638) आणि मोबाईल फोन, असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरीला गेलेली गाय मालकाच्या स्वाधीन
चोरीला गेलेल्या जनावराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी काळ्या रंगाची गाय आढळून आली. फिर्यादीने गाय ओळखल्यानंतर पोलिसांनी ती त्यांच्या स्वाधीन केली.
या प्रकरणातील आरोपी सध्या खदान पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे. कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्याचा ताबा चान्नी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी घेण्यात येणार आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
अकोट फाईलमध्ये नाकाबंदीत दोन गोवंशीय जनावरे आढळली
दरम्यान, अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश तस्करीविरोधात नाकाबंदी करण्यात आली होती. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने फातेमा हॉस्पिटल परिसरात नाकाबंदी केली.
यावेळी पांढऱ्या रंगाच्या टाटा एस वाहनाची (MH-04-HS-2031) तपासणी केली असता, त्यामध्ये दोन गोवंशीय जनावरे निर्दयतेने कोंबून दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली.
या प्रकरणी पोलिसांनी मंगेश गजानन बाळापुरे (वय ३२, रा. दर्यापूर, जि. अमरावती) आणि शेख ऐफाज शेख एजाज (वय ३०, रा. शादाब नगर, अकोट फाईल, अकोला) यांना ताब्यात घेतले.
वाहन आणि गोवंश असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमान्वये अकोट फाईल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन प्रकरणांच्या तपासाला गती
एलसीबीच्या या कारवाईमुळे खदान, चान्नी आणि अकोट फाईल पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गोवंश चोरी व तस्करीशी संबंधित तीन प्रकरणांच्या तपासाला गती मिळाली आहे. या कारवाईत एकूण सुमारे ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, अनिल चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदार आणि चालकांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
फरार आरोपींचा शोध सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून करण्यात येत आहे.






