Home Breaking News अमरावती शिक्षक मतदारसंघात ‘उमेदवारी’चा सस्पेन्स कायम!

अमरावती शिक्षक मतदारसंघात ‘उमेदवारी’चा सस्पेन्स कायम!

 

सरनाईकांचे नाव चर्चेत; भाजपमध्ये भोयर-शिंदे सक्रिय, काळमेघांच्या एंट्रीने महायुतीचे गणित बदलण्याची शक्यता

 

 

श्रीकांत पाचकवडे

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप वेळ असला, तरी राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसतानाच संभाव्य उमेदवारांच्या नावांवरून पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) या जागेवर दावा करणार असल्याची चर्चा असून विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचे नाव पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. दुसरीकडे भाजपमधील इच्छुकांनीही मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केल्याने महायुतीचे अंतर्गत राजकारण लक्षवेधी ठरत आहे.

 

सरनाईकांना पुन्हा संधी मिळणार?

 

२०२०च्या निवडणुकीत भाजपने या मतदारसंघातून उमेदवार दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. शिवसेनेतील फूट, महायुतीची पुनर्रचना आणि बदललेले जागावाटप यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

 

मागील निवडणुकीत किरण सरनाईक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांचा पूर्वीचा निवडणूक अनुभव आणि सध्याची पक्षीय भूमिका लक्षात घेता त्यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.

 

शिवसेनेत देशपांडे ही प्रबळ दावेदार 

 

सरनाईकांसोबतच शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या दावेदारी ही प्रबळ मानली जात आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून अविरत लढा देत असल्याने श्रीकांत देशपांडे यांना मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे. त्या दृष्टीने त्यांनी ग्राउंड लेव्हलवर फिल्डिंग लावली असून उमेदवारी न मिळाल्यास स्वतंत्र पर्याय शोधण्याची तयारी त्यांच्या गोटा कडून सुरू आहे.

 

त्यामुळे शिवसेनेसमोर विद्यमान आमदार की माजी आमदार? असा संभाव्य पर्याय उभा राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मात्र, पक्षाकडून अधिकृत निर्णय झालेला नसल्याने सध्या ही नावे चर्चेपुरतीच आहेत.

 

भाजपमध्ये इच्छुकांची ‘फिल्डिंग’

 

दुसरीकडे भाजपमध्येही उमेदवारीसाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. शेखर भोयर आणि डॉ. संगीता शिंदे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. दोन्ही इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जाते.

 

भोयर यांच्या उमेदवारीसाठी आमदार राजेश तायडे, तर डॉ. संगीता शिंदे यांच्यासाठी खासदार अनिल बोंडे सक्रिय असल्याची राजकीय चर्चा आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी नेतृत्व म्हणून शेखर भोयर यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.

 

काळमेघांच्या नावाने नवे समीकरण

 

याचदरम्यान शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत काळमेघ यांचे नाव चर्चेत आल्याने भाजपच्या संभाव्य उमेदवारीच्या गणिताला नवे वळण मिळाले आहे. भाजपच्या काही नेत्यांनी काळमेघ यांच्याशी चर्चा केल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

 

काँग्रेसकडून प्रा. अदिती पोहरे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर काळमेघ यांच्या नावाकडेही वेगळ्या राजकीय समीकरणातून पाहिले जात आहे. प्रा. अदितीताई पोहरे ह्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या असून ज्येष्ठ शेतकरी, नेते ज्येष्ठ संपादक प्रकाश भाऊ पोहरे यांच्या सुन आहेत. त्यामुळे सासर आणि माहेरचे भक्कम राजकीय वजन आणि शिक्षकांसाठी युवा नेतृत्व म्हणून अदिती पोहरे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जाते.

 

महायुतीसमोर खरी कसोटी जागावाटपाची

 

अमरावती शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे राजकारण केवळ उमेदवाराच्या नावावर ठरणार नाही, तर जागा कोणत्या पक्षाला मिळते आणि त्यानंतर इच्छुकांची भूमिका काय राहते, यावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

 

जागा शिवसेनेकडे गेल्यास भाजपमधील इच्छुक काय भूमिका घेतात, याला विशेष महत्त्व असेल. पक्षांतर्गत नाराजी, स्वतंत्र उमेदवारी किंवा संभाव्य बंडखोरी झाली तर महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर वेगळे आव्हान निर्माण होऊ शकते.

 

अनेक नावे चर्चेत; निर्णयाकडे लक्ष

 

सध्या किरण सरनाईक, श्रीकांत देशपांडे, शेखर भोयर, डॉ. संगीता शिंदे, हेमंत काळमेघ, दत्ता लहाने, दिलीप कडू, सुरेश देवकर आणि प्रा. अदिती पोहरे अशी विविध नावे राजकीय चर्चेत आहेत.

 

मात्र, चर्चेतील नावे आणि अधिकृत उमेदवार यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे पक्षांकडून अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत कोणाचे नाव निश्चित मानायचे, याबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

 

जागावाटप → उमेदवारी → नाराजी → बंडखोरी?

 

अमरावती शिक्षक मतदारसंघातील पुढील राजकीय चित्र या चार टप्प्यांवर आकार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीपेक्षा उमेदवारीच्या राजकारणाचीच रंगत अधिक वाढली आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच कोणत्या पक्षाचे कोणते राजकीय गणित प्रत्यक्षात उतरते, हे स्पष्ट होणार आहे.

Don`t copy text!