Home Breaking News दोन महिन्यांच्या पावसाच्या खंडाने कुटासा परिसरातील कपाशी करपली; शेतकरी आर्थिक संकटात

दोन महिन्यांच्या पावसाच्या खंडाने कुटासा परिसरातील कपाशी करपली; शेतकरी आर्थिक संकटात

 

उत्पादन घटण्याची भीती; उसनवारी आणि सोने गहाण ठेवून केलेली गुंतवणूक धोक्यात, शेतमजुरांच्याही हाताला काम नाही

 

 

कुशल भगत 

कुटासा : खारपानपट्ट्यातील कुटासा, रोहणखेड आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील कपाशीचे पीक गंभीर संकटात सापडले आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, पीक फुलोरा आणि बोंडधारणेच्या निर्णायक टप्प्यात असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. परिणामी, कपाशीची झाडे कोमेजू लागली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

 

पावसाअभावी फुल-पात्यांची गळती

 

कडक उन्हाचा तडाखा आणि जमिनीतील कमी झालेला ओलावा यामुळे कपाशीच्या झाडांची वाढ खुंटली आहे. अनेक शेतांमध्ये फुल आणि पात्यांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. बोंडांची वाढही अपेक्षेप्रमाणे होत नसून काही शेतांमध्ये एका झाडाला केवळ चार ते पाच बोंडे दिसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाच्या कापूस उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिंता निर्माण झाली आहे.

 

उसनवारी, कर्ज आणि सोने गहाण ठेवून केलेली गुंतवणूक धोक्यात

 

कपाशीच्या पेरणीपूर्व मशागतीपासून बियाणे, खते, कीडनाशके आणि फवारण्यांपर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. चांगले उत्पादन मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी केली, तर काहींनी घरातील सोने गहाण ठेवून शेतीत पैसा उभा केला. मात्र, आता पीकच संकटात सापडल्याने खर्च केलेले भांडवल तरी परत मिळेल का? या प्रश्नाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

शेतीची कामे थांबली; शेतमजुरांच्या हाताला काम नाही

 

पावसाअभावी कपाशीच्या शेतातील अनेक कामांना ब्रेक लागला आहे. परिणामी, ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या हाताला रोजगार मिळणे कठीण झाले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून पिकासोबतच ग्रामीण रोजगाराचेही संकट तीव्र झाले आहे.

 

घोषणांपलीकडे प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा

 

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदतीच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्ष आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी पोहोचणार, असा सवाल परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. पावसाच्या दीर्घ खंडामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई आणि शेतमजुरांसाठी रोजगाराची व्यवस्था करावी, अशी मागणी कुटासा-रोहणखेड परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

पावसाचा खंड वाढत असताना प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Don`t copy text!