Home Breaking News ‘माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो ?’ कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने जाब...

‘माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो ?’ कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने जाब विचारताच टवाळखोरांनी संपवलं

‘माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो ?’ कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने जाब विचारताच टवाळखोरांनी संपवलं

नागपूर : एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वानाडोंगरी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या भागातील मातोश्री नगरमध्ये राहणाऱ्या पंकज ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारल्यामुळे रागावलेल्या टवाळखोरांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून किरकोळ कारणावरून चक्क पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (2 एप्रिल) दुपारी पंकज ठाकूर यांनी आकाश मंडल या परिसरातच राहणाऱ्या तरुणाला माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो ? असा जाब विचारला होता. त्याच्यातून रागावलेल्या आकाशने त्याच्या काही सहकारी आणि कुटुंबीयांसोबत काल रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पंकज ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आकाशने हातातली लोखंडी सळी पंकज यांच्या छातीवर खूपसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेत पंकज सोबतचे त्यांचे काही नातेवाईकही जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आकाश मंडल सोबत या हल्ल्यामध्ये आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास केला जात आहे.

एका पोलीस कर्मचाऱ्याला टवाळखोरांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे, ते पाहता अशा टवाळखोरासमोर सामान्य माणसाची काय स्थिती होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. तर दुसरीकडे गृहमंत्र्याच्या गृहजिल्ह्यात अशा गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नाहीये का ? असा प्रश्नही सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

Don`t copy text!