Home विदर्भ दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश...

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव

निलेश देव
निलेश देव
श्रीकांत पाचकवडे
अकोला : शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी असताना अकोट फाईल तीन खंबे (प्रताप मार्बल) ते हनुमान चौक दरम्यानची सुमारे १९०० मीटर लांबीची १२ इंचांची जुनी पी.आय. पाईपलाईन अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी केला आहे.
देव यांनी सांगितले की, सन २००२ मध्ये वारी जलयोजनेअंतर्गत ही पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सन २०२१ मध्ये अकोट फाईल परिसरात नवीन पाण्याची टाकी उभारून नायगाव, शिडोळ, भरतनगर, शंकरनगर, लाडीस फाईल, बापूनगर, पंचशीलनगर, दम्माणी, न्यू तापडिया नगर, खरप, डुंबेवाडी तसेच प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील हद्दवाढ भागांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार न करता आजही संपूर्ण परिसराला जुन्याच १२ इंचांच्या पाईपलाईनवर अवलंबून ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, अकोला–अकोट मार्गाच्या रस्ता विस्तारीकरणादरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांची बांधकामे पाईपलाईनवर करण्यात आल्याने जवळपास संपूर्ण पाईपलाईन नाल्यांच्या खाली गेली आहे. अनेक ठिकाणी ती फुटल्याने नाल्यातील दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे.
या गंभीर प्रकारामुळे जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून सार्वजनिक आरोग्यावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. हा प्रकार केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर अन्याय असल्याची टीका निलेश देव यांनी केली.
त्यांनी पुढे सांगितले की, २०२१ मध्ये नवीन पाण्याची टाकी उभारताना अमृत योजना किंवा अन्य निधीतून जुनी पाईपलाईन बदलणे अपेक्षित होते. मात्र हा विषय दुर्लक्षित राहिल्यामुळे आज हजारो नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.
यामुळे अकोट फाईल तीन खंबे (प्रताप मार्बल) ते हनुमान चौक या मार्गावरील १९०० मीटर लांबीची जुनी १२ इंच पी.आय. पाईपलाईन तातडीने बदलून १६ इंच क्षमतेची नवीन एच.डी.पी. पाईपलाईन टाकण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निलेश देव यांनी दिला.
Don`t copy text!