बुलढाणा | प्रतिनिधी
राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया पुढे ढकलली जाणार असल्याचे सांगितल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
तुपकर म्हणाले की, सरकारला प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचीच नाही. केवळ १० ते १५ टक्के शेतकरीच योजनेत बसतील, अशा पद्धतीने निकष तयार करण्याचा सरकारचा छुपा अजेंडा आहे. कमीत कमी शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतील, यासाठीच वारंवार तारखा पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय शेतकऱ्यांमध्ये गट-तट निर्माण करून त्यांच्यात मतभेद वाढवण्याचाही प्रयत्न सरकार करत असल्याचा दावा तुपकर यांनी केला. “सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. कर्जमाफीबाबत फिरवाफिरवी सुरूच राहिली, तर राज्यभरात मोठे जनआंदोलन उभे करू. महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरलेला सरकारला दिसेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
“२०२९ पर्यंत शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याचा प्रयत्न”
सरकारने आधी ३० जूनची मुदत दिली, त्यानंतर ती पुढे ढकलली. आता पुन्हा नवीन तारीख दिली जाईल आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांना २०२९ पर्यंत झुलवत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्नत्याग आंदोलनानंतर पुन्हा आक्रमक भूमिका
सरसकट, विनाअट आणि विनाशर्त कर्जमुक्ती, पिकविमा तसेच इतर शेतकरी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चा आयोजित करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितल्यानंतर तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.
दरम्यान, सरकारने मागितलेली मुदत संपल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत आंदोलनाची तयारी
सरकारने तातडीने कर्जमाफीबाबत निर्णय न घेतल्यास लवकरच मुंबईत मोठे आंदोलन छेडले जाईल. राज्यभरातील शेतकरी एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडतील, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.






