सात दिवसांचा अहोरात्र पाठलाग, १२०० किमीचा प्रवास; अकोला-अकोटमधील चोरीची तब्बल ११.९० लाखांची रोकड हस्तगत
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला शहर आणि अकोट येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावताना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशात आंतरराज्यीय धडक कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, सायबर सेलची मदत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी राजगड जिल्ह्यातील कडिया येथील सांसी/सिसोदिया टोळीपर्यंत धागेदोरे पोहोचवले. आरोपींच्या मागावर तब्बल सात दिवस अहोरात्र पाठलाग करून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास करत पोलिसांनी चोरीतील ११ लाख ९० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.
प्रणव ज्वेलर्सच्या संचालकाकडून ९.५० लाखांची चोरी
सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रणव ज्वेलर्सचे संचालक परेश चंदुलाल सराफ हे दुकान बंद करून घरी पोहोचले असता, त्यांच्या TVS ज्युपिटरच्या डिक्कीत ठेवलेली ९ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि चाव्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अकोटमध्ये एसबीआय शाखेबाहेर २.८८ लाखांवर डल्ला
दुसऱ्या घटनेत अकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय स्टेट बँक, मुख्य शाखा अकोट येथून योगेश पुरुषोत्तम चांडक यांची २ लाख ८८ हजार रुपयांची रोकड असलेली कापडी पिशवी अज्ञात चोरट्याने पळवून नेली होती. याप्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८३/२०२६ दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून मध्य प्रदेशातील टोळीपर्यंत धागेदोरे
दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी पथकाची नियुक्ती केली.
पथकाने घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तसेच तांत्रिक तपास, सायबर सेलची मदत आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीच्या घटनांमागे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सांसी/सिसोदिया टोळीचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कडिया गावात छापा; आरोपी पसार, मात्र रोकड पोलिसांच्या हाती
संशयित आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेशात दाखल झाले. राजगड पोलीस नियंत्रण कक्ष आणि बोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडिया गावात स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांच्या घरांवर अचानक छापे टाकण्यात आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी पसार झाले. मात्र, त्यांच्या घरांची कसून झडती घेतल्यानंतर चोरीची रोकड पोलिसांच्या हाती लागली.
११.९० लाखांची रोकड जप्त
जॉकी सिसोदिया याच्या घरातून सिव्हिल लाईन, अकोला येथील चोरीतील ९ लाख ५० हजार रुपये हस्तगत.
गौरव गोविंद सांसी याच्या घरातून अकोट शहरातील स्टेट बँक चोरीतील २ लाख ४० हजार रुपये हस्तगत.
अशाप्रकारे दोन्ही गुन्ह्यांतील एकूण ११ लाख ९० हजार रुपयांची रोकड पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त केली आहे. पसार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपासात या टोळीशी संबंधित आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, माजिद पठाण, अनिल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, फिरोज खान, उमेश पराये, अब्दुल माजिद, एजाज अहमद, खुशाल नेमाडे, भारकर धोत्रे, राहुल गायकवाड, श्रीकांत पातोंड, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे, आकाश मानकर, राज चंदेल, अमोल दिपके आणि चालक प्रकाश लोखंडे यांनी केली.






