Home Breaking News मुख्यमंत्र्यांचा हात खेचला अन्‌ क्षणात बदललं वातावरण; ‘देवाभाऊ’ म्हणत महिला शेतकऱ्याचा बांध...

मुख्यमंत्र्यांचा हात खेचला अन्‌ क्षणात बदललं वातावरण; ‘देवाभाऊ’ म्हणत महिला शेतकऱ्याचा बांध फुटला!

श्रीकांत पाचकवडे

अकोला : सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवत एका महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात पकडला आणि त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. क्षणभर उपस्थित सुरक्षा रक्षक, माध्यमांचे प्रतिनिधी आणि आजूबाजूचे सर्वजण स्तब्ध झाले. प्रोटोकॉलचा भंग झाल्याने आता पुढे काय होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या.

 

पुढच्याच क्षणी सतर्क झालेला सुरक्षा रक्षक पुढे सरसावला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे पाहत त्याला थांबवले. त्यानंतर जे घडले, ते उपस्थितांसाठी अनपेक्षित होते.

 

मुख्यमंत्री स्वतः त्या महिलेच्या जवळ गेले. आणि इतका वेळ मनात साचलेला तिच्या दुःखाचा बांध फुटला. ती ओक्साबोक्शी रडू लागली. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरू होत्या. शब्दही नीट फुटत नव्हते. मात्र, तिच्या अश्रूंमधून तिची व्यथा स्पष्ट दिसत होती.

 

“पाऊस आला नाही… उभं पीक हातातून गेलं… आता पुढे काय करायचं?”

 

पावसाअभावी शेतीचे झालेले नुकसान आणि त्यातून निर्माण झालेली चिंता ती मुख्यमंत्र्यांसमोर मांडत होती. मुख्यमंत्री तिचं म्हणणं शांतपणे ऐकत राहिले. तिला धीर दिला.

 

त्या क्षणी तिच्यासमोर राज्याचा सर्वोच्च पदाधिकारी नव्हता, तर आपल्या अडचणी ऐकून घेणारा ‘देवाभाऊ’ होता.

 

आपल्या घरात संकट आलं की माणूस शेवटी आपल्या माणसाकडेच धाव घेतो. त्या महिलेची अवस्थाही काहीशी अशीच होती. आपल्या व्यथा सांगितल्यानंतर कुणीतरी आपल्याला समजून घेईल, मदत करेल, हा विश्वास तिच्या डोळ्यांत दिसत होता.

 

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दौऱ्यात मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

 

शेतकऱ्यांना दिलासा देताना दुष्काळासंदर्भात शासन आदेश काढण्यात येईल आणि दिवाळीपूर्वी सरसकट आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा करण्यात आली. चारा व पाणीटंचाईवरही उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

 

ती मिठी अनेक प्रश्न सांगून गेली…

त्या महिलेने मुख्यमंत्र्यांना मारलेली मिठी ही केवळ भावनिक क्षण नव्हती; ती संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाच्या व्यथेची अभिव्यक्ती होती.

 

शेतकरी संकटात असताना त्याला केवळ आर्थिक मदतीचीच गरज नसते. आपली व्यथा कुणीतरी ऐकावी, आपली परिस्थिती समजून घ्यावी आणि आपण एकटे नाही, असा आधार मिळावा, हीदेखील त्याची अपेक्षा असते.

 

त्या महिलेच्या चेहऱ्यावर बोलून झाल्यानंतर एक वेगळंच समाधान दिसत होतं. मनात साचलेलं ओझं कुणाकडे तरी सोपवल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर होती.

 

आणि कदाचित तिच्या त्या मिठीत एक न बोललेला विश्वासही होता—

 

“देवाभाऊ… आता तुम्हीच काहीतरी करा!”

Don`t copy text!