Home Breaking News शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाखांची मदत द्या; काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण...

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाखांची मदत द्या; काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांची मागणी 

 

केवळ दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा

श्रीकांत पाचकवडे

अकोला : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला, तरी केवळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार नाहीत. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने थेट आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय तातडीने न घेतल्यास काँग्रेस पक्षाकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आमदार साजिद खान पठाण यांनी दिला आहे.

 

शासनाने केवळ शासन निर्णय काढून विविध योजना आणि मदतीच्या घोषणा करण्यापेक्षा त्या मदतीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके हातची गेली असून उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ न घालवता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितले.

 

दौरे आणि फोटोसेशनपेक्षा प्रत्यक्ष मदत महत्त्वाची

 

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी, दौरे, फोटोसेशन आणि रील्स करण्यापेक्षा त्यांच्या खात्यात प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा करण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, अशी भूमिका आमदार साजिद खान पठाण यांनी मांडली आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे हताश आणि आर्थिक अडचणीत असून त्याला तातडीच्या मदतीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्या

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. या मदतीवर कोणत्याही प्रकारची मर्यादा लावू नये, अशी मागणीही आमदार साजिद खान पठाण यांनी केली आहे. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

 

शेतकऱ्यांना केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत हवी आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास काँग्रेस पक्ष त्यांच्या हक्कांसाठी पूर्ण ताकदीने संघर्ष करेल, असा इशाराही आमदार साजिद खान पठाण यांनी दिला आहे.

Don`t copy text!