फरार होण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अवघ्या दोन तासांत रेल्वे स्थानक परिसरातून पकडले; LCB व MIDC पोलिसांची सात पथके सक्रिय
श्रीकांत पाचकवडे
अकोला : शिवणी परिसरातील जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणावर चाकूने वार करून त्याचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणात अकोला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तीन आरोपींना ताब्यात घेतले. फरार होण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या आरोपींना पोलिसांनी सापळा रचून पकडल्याने त्यांच्या पसार होण्याच्या प्रयत्नाला लगाम बसला.
२९ सप्टेंबर रोजी किसान नगर, शिवणी येथील उजेफखान नझीरखान (वय २०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कांतीनगर परिसरात जुन्या वादातून काही जणांनी त्यांच्यासह त्यांच्या भावासोबत वाद घालत मारहाण केली. यावेळी त्यांचा मामेभाऊ सैय्यद फैजान सैय्यद रफीक (वय २२) याच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी फैजानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि विजय जाधव यांना आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे निर्देश दिले.
सात पथकांकडून शोधमोहीम
पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन आरोपींबाबत माहिती घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची पाच, तर एमआयडीसी पोलिसांची दोन अशी सात पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मारहाणीत जखमी झालेला सत्यम उर्फ गोलू सुरेश गवई (२५), रा. क्रांतीनगर, शिवणी याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
रेल्वे स्थानक परिसरात सापळा
तांत्रिक तपासातून उर्वरित आरोपी शिवणी रेल्वे स्थानक परिसरात असून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर LCB आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकांनी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अक्षय उर्फ अजय गजानन कंकाळ (२३), आदित्य उर्फ रावण शरद वानखेडे (२०) आणि संतोष गजानन काशीदे (४३) अशी आहेत. तिघेही अकोला शहरातील शिवणी परिसरातील रहिवासी आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्यासह स.पो.नि. निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, पोउपनि विष्णु बोडखे, पोउपनि अनिल चव्हाण तसेच LCB व एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.






