दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे दिले आदेश
श्रीकांत पाचकवडे
अकोला : जननी सुरक्षा योजनेच्या निधीत सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांची नियमबाह्य उचल केल्याची बातमी प्रकाशित करताच या
वृत्ताची दखल घेत भाजप विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार सावरकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सोनुने यांना संबंधित प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
जननी सुरक्षा योजनेच्या निधीच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप असून, विभागप्रमुख डॉ. अपर्णा वाहणे यांनी नियमबाह्यपणे 11 लाख 50 हजार च्या निधी वैयक्तिक कामासाठी उचल केल्याच्या गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे संबंधित रक्कम कोणत्या कारणासाठी व कोणत्या मंजुरीच्या आधारे काढण्यात आली, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बिले, व्हाउचर, मंजुरी आदेश, बँक व्यवहार, कॅशबुक तसेच लाभार्थींच्या नोंदींची पडताळणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची चौकशी होऊन सुद्धा दोषींवर कारवाई करण्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू असल्याने गोरगरीब महिलांच्या हक्काचा पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना अभय का ? मिळत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय निधीचा वैयक्तिक कामासाठी नियमबाह्यपणे उचल करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याने या गंभीर प्रकरणात आमदार रणधीर सावरकर यांनी तत्काळ कारवाई करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.






