‘ऑपरेशन प्रहार’चा दणका! अकोल्यात गांजाची वाहतूक करणारा तरुण जेरबंद
एक लाखांचा मुद्देमाल जप्त
स्कुटीच्या डिक्कीतून १ किलो ९५१ ग्रॅम गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अकोट ते हिवरखेड मार्गावरील लाडेगाव फाट्याजवळ गांजाची वाहतूक करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ किलो ९५१ ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली स्कुटी असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गांजाच्या वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोट ते हिवरखेड मार्गावरील लाडेगाव फाट्याच्या परिसरात तपासणी केली.
यावेळी एका संशयिताची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातील लाल-काळ्या रंगाच्या डीओ स्कुटीच्या (क्रमांक एमएच २८ बीयू १७२६) डिक्कीत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. पंचांसमक्ष वजन केले असता, पिशवीसह त्याचे वजन १ किलो ९५१ ग्रॅम भरले.
गांजा आणि स्कुटी असा एक लाखांचा मुद्देमाल
पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये, तर स्कुटीची किंमत ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रोशन ऊर्फ तेजस रमेश कन्नाक (वय २३, रा. अडगाव बु., ता. तेल्हारा, जि. अकोला) याच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) १९८५ च्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतल्याचे स्पष्ट होत आहे.






