‘No Record Found’च्या तांत्रिक घोळाविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार
दोन महिन्यांपासून तक्रारी करूनही दखल नाही; तांत्रिक अडचणी दूर न केल्यास तीव्र आंदोलनाचा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांचा इशारा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : कर्जमाफीच्या यादीत नाव समाविष्ट असूनही आधार प्रमाणीकरण करताना ‘No Record Found’ असा संदेश येत असल्याने अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे. बँक स्तरावरील माहितीतील त्रुटी, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि शेतकरी ओळखपत्राच्या (Farmer ID) समस्यांमुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक यांची भेट घेत सामूहिक तक्रार अर्ज व निवेदन सादर केले. योजनेच्या याद्यांत नाव असूनही प्रत्यक्ष लाभ मिळत नसेल, तर या तांत्रिक त्रुटींची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल संघटनेने उपस्थित केला.
यादीत नाव, पण पोर्टलवर ‘No Record Found’!
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’च्या अधिकृत यादीत नावे समाविष्ट असल्याचे सांगणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा बँकेत गेल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रमाणीकरण करताना संगणक प्रणालीवर ‘No Record Found’ असा संदेश दिसत असल्याने प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची तक्रार आहे.
बँकेच्या स्तरावर माहिती अद्ययावत नसणे, सरकारी पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी आणि Farmer ID संदर्भातील अडचणी यांमुळे पात्र शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ रखडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिणामी, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दोन महिन्यांपासून कार्यालयांचे उंबरठे झिजवले!
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, संबंधित शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अकोट येथे लेखी तक्रारी दाखल केल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, या तक्रारींवर ठोस कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर जिल्हा सहाय्यक निबंधक कार्यालय, अकोला येथेही पाठपुरावा करण्यात आला. तरीही प्रश्न सुटला नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनासमोर आपली व्यथा मांडली.
प्रशासनाच्या चुका, भुर्दंड शेतकऱ्यांना का?
निवेदनादरम्यान जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी प्रशासन आणि बँकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तांत्रिक त्रुटींचा फटका पात्र शेतकऱ्यांना बसत असेल, तर त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी तातडीने पार पाडली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
संघटनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
कर्जमाफी पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात.
‘No Record Found’ या समस्येचे निराकरण करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीत करावी.
Farmer ID संदर्भातील अडचणी युद्धपातळीवर सोडवाव्यात.
पात्र शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी करून त्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा.
प्रलंबित तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही केवळ तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व अडचणी दूर कराव्यात आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या लढ्यात संघटनेचे पदाधिकारी सहभागी
या वेळी युवक जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खोडके, जिल्हा सचिव रमेश चिंचे, अकोला तालुकाध्यक्ष मंगेश गावंडे, जयवंत तरोळे, शंकर सनगाळे, दीपक वाडेकर, सुदर्शन गव्हाणे, अमोल ठाकरे, रामेश्वर जंजाळ, नितीन ढोरे, रोशन भालतीलक, शुभम पारसकर आणि भास्कर भगत यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.






