Home Breaking News Akola : १२० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ४८ तासांत चोरीचा छडा; ५.१० लाखांचे...

Akola : १२० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ४८ तासांत चोरीचा छडा; ५.१० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

 

 

Akola :स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; परळी वैजनाथ येथून मुद्देमाल हस्तगत

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या चोरट्याचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत छडा लावला. तब्बल १२० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी परळी वैजनाथ (जि. बीड) येथून चोरीला गेलेले सुमारे ५ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास कौशल्याचे प्रत्यंतर आले आहे.

 

पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास

 

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कौलखेड येथील राहुल शिवलिंग गोटे (वय ६२) हे सरकारी गोदामासमोरून जात असताना अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आपण पोलीस असल्याचे सांगत, दागिने घालून कुठे चाललात, अशी विचारणा केली.

 

त्यानंतर दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने त्यांना सोन्याचा गोफ आणि अंगठी रुमालात बांधण्यास सांगितले. हातचलाखी करून आरोपीने दागिने स्वतःकडे घेतले आणि रुमाल फिर्यादींच्या हातात दिला. काही वेळाने रुमाल तपासला असता त्यात पाकीट व मोबाईल आढळले; मात्र सोन्याचे दागिने गायब होते. सुमारे ३४ ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच गोटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५३८/२०२६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

 

हेल्मेट आणि नंबरप्लेटविना वाहनामुळे तपासाचे आव्हान

घटनेनंतर आरोपीने ओळख लपविण्यासाठी हेल्मेटचा वापर केला होता. तसेच तो नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून फिरत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना दोन पथके तयार करून समांतर तपास करण्याचे निर्देश दिले.

 

१२० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळासह परिसरातील एकूण १२० सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील बातमीदारांच्या मदतीने संशयिताचा माग काढण्यात आला.

 

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा संशयित हा परळी वैजनाथ येथील इराणी वस्ती परिसरातील हसन अली ऊर्फ क्रिश शेको अली (वय अंदाजे २५) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडे फुटेजमध्ये दिसणारी दुचाकी असून, तिचा वापर अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी केला जात असल्याची माहितीही पुढे आली.

 

आरोपीचा शोध; भाड्याच्या खोलीत दागिने सापडले

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परळी वैजनाथ येथे दाखल झाले. सुरुवातीला इराणी वस्ती आणि शहर परिसरात शोध घेऊनही संशयित मिळून आला नाही. पुढील तपासात तो सरदारनगर परिसरातील मित्र हसनी अली हाशम अली याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली.

 

स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी शोध घेण्यात आला. संशयित तेथे आढळला नाही; मात्र दोन पंच आणि मित्राच्या उपस्थितीत त्याच्या भाड्याच्या खोलीची तपासणी केली असता चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने मिळून आले. पोलिसांनी एक सोन्याची अंगठी आणि पेंडंटसह सोन्याचा गोफ, असे एकूण ३४ ग्रॅम वजनाचे व अंदाजे ५ लाख १० हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले. पुढील तपासासाठी आरोपीविषयीची माहिती आणि जप्त मुद्देमाल खदान पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

 

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्यासह विष्णू बोडखे, माजिद पठाण, वसीमुद्दीन, किशोर सोनवणे, रवी खंडारे, मंगेश इंगळे, स्वप्नील खेडकर, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, शेख हसन, अब्दुल माजिद, एजाज अहमद, अमित दुबे, श्रीकांत पातोंड, अन्सार अहमद, राज चंदेल, आकाश मानकर, धीरज वानखडे, पवन डंबलकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतीश पवार, अशोक सोनवणे, भीमराव दीपके तसेच चालक प्रविण कश्यप, मनिष ठाकरे, देवानंद खरात आणि प्रकाश लोखंडे यांनी सहभाग घेतला.

Don`t copy text!