Home Breaking News वारुळ्यात संतापजनक घटना! ४ एकरांतील सोयाबीनची गंजी आगीत भस्मसात; शेतकरी महेश मोहोकार...

वारुळ्यात संतापजनक घटना! ४ एकरांतील सोयाबीनची गंजी आगीत भस्मसात; शेतकरी महेश मोहोकार यांची प्रकृती खालावली

 

अज्ञात व्यक्तीकडून आग लावल्याचा आरोप; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील शेती बचावली

 

कुशल भगत | विशेष प्रतिनिधी

 

अकोट : अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरात सोयाबीनची गंजी जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार एकरांतील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा आरोप असून, या घटनेत शेतकरी महेश रामभाऊ मोहोकार यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. डोळ्यांदेखत वर्षभराच्या कष्टाची राखरांगोळी होताना पाहून त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

आगीच्या ज्वाळांनी घेतले रौद्ररूप; गावकऱ्यांची धावपळ

 

सायंकाळी सुमारे ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. सोयाबीनच्या गंजीला चारही बाजूंनी आग लागल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट आणि धुराचे ढग दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

सोयाबीनची गंजी

मात्र, पाण्याची उपलब्धता कमी असल्याने ग्रामस्थांना आग आटोक्यात आणण्यात अडचणी आल्या. शेतकऱ्याने वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे पीक जळताना पाहून उपस्थितांनाही मोठा धक्का बसला.

 

अग्निशमन दलाची धाव; शेजारील पिकांना दिलासा

सोयाबीनची गंजी

घटनेची माहिती संदीप काळे यांनी तातडीने अकोट पोलिसांना दिली. त्यानंतर अकोट पोलीस आणि अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

 

वेळीच आग विझवण्यात आल्याने शेजारील शेतांमधील पिकांना आगीचा धोका टळला. त्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

पोलिसांकडून पंचनामा; तहसीलदारांकडे अहवाल जाणार

 

घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिट जमादार निलेश खंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवकुमार तोमर, पोलीस कॉन्स्टेबल नितीन तेलगोटे, सागर नागे आणि अमोल म्हस्के यांच्यासह कृषी अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

 

या घटनेचा सविस्तर अहवाल अकोट तहसीलदारांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

 

आरोपीचा शोध घेऊन नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांची मागणी

 

शेतातील उभ्या कष्टाची अशी राखरांगोळी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमागील अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वणी वारुळा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

OTT News |

Don`t copy text!