दुःखाचा डोंगर कोसळला, पण लेकीने शिक्षणाची वाट सोडली नाही; वैभवी देशमुखच्या यशाचे सर्वत्र कौतुक!
OTT News | विशेष वृत्त
बीड : वडिलांची निर्घृण हत्या, कुटुंबावर कोसळलेले संकट आणि न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष… अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठा कायम ठेवणाऱ्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने एमबीबीएस प्रथम वर्षाची परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर देशमुख कुटुंबाला मोठ्या मानसिक आघाताला सामोरे जावे लागले. एका बाजूला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना दुसरीकडे न्यायासाठीचा संघर्ष सुरू होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत वैभवीने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत डॉक्टर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.
संकटांवर मात करत वैभवीची यशस्वी भरारी!
वडिलांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मात्र, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी ध्येयापासून दूर जायचे नाही, हे वैभवीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे ही तिच्या मेहनतीची आणि जिद्दीची पावती मानली जात आहे.
वैभवीच्या या यशाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी तिची भेट घेतली. तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वैभवीला भेटून आनंद झाल्याची भावना व्यक्त करत तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
वैभवीची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी!
दुःखद प्रसंगामुळे आयुष्य विस्कळीत झाले असतानाही शिक्षणाची कास न सोडता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वैभवीचे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. तिच्या यशामुळे देशमुख कुटुंबाच्या संघर्षाला आशेची नवी किनार मिळाली आहे.
वडिलांच्या आठवणी उराशी बाळगून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या वैभवी देशमुखला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तिच्या यशाची ही भरारी अनेक विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानण्याची प्रेरणा देणारी ठरो.
OTT News






