Home Breaking News Akola : शासकीय प्रकल्पांचे आमिष दाखवून अकोल्यातील तिघांचा नागपुरच्या कंपनीला २ कोटींचा...

Akola : शासकीय प्रकल्पांचे आमिष दाखवून अकोल्यातील तिघांचा नागपुरच्या कंपनीला २ कोटींचा गंडा!

 

पुण्याच्या कन्सल्टन्सी फर्ममधील तिघांविरुद्ध नागपुर तहसील पोलिसांत गुन्हा

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला (Akola) शासकीय योजनांमधील कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवून अकोल्यातील तिघांनी नागपुरातील इझीस्पिट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची तब्बल २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील पाथवे बिझनेस कन्सल्टन्सीशी संबंधित तिघांविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

राहुल गोपाळराव शिरस्कर (४१), रोहित रांदळ (४०) आणि अंकुश हरिकिसन अग्रवाल (४२), अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही अकोल्यातील रहिवासी असून सध्या पिंपरी-चिंचवड येथे त्यांनी कंपनी थाटली आहे. शासकीय प्रकल्पाचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची आपली फसवणूक झाल्याची तक्रार कंपनीच्या संचालक रितू भारत मल्होत्रा (३१) यांनी पोलिसांकडे केली असून या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

 

मोठ्या शासकीय प्रकल्पांचे दाखविले आमिष

 

पोलिसांच्या माहितीनुसार, पाथवे बिझनेस कन्सल्टन्सीच्या संचालकांनी इझीस्पिट कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधला. शासनाच्या विविध योजनांमधील मोठ्या प्रकल्पांचे काम कंपनीला मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

यासाठी शासकीय प्रकल्पांशी संबंधित काही कागदपत्रेही दाखविण्यात आली. त्यामुळे कंपनीच्या संचालकांचा आरोपींवर विश्वास बसला.

 

२ कोटी घेतले; मात्र प्रकल्प मिळवून दिला नाही

 

प्रकल्प मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात कंपनीकडून २ कोटी रुपये घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, रक्कम दिल्यानंतरही कंपनीला एकही शासकीय प्रकल्प मिळवून देण्यात आला नाही.

 

त्यानंतर कंपनीने पैसे परत मागितले. मात्र, आरोपींकडून रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

तहसील पोलिसांकडून तपास सुरू

 

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रितू मल्होत्रा यांनी तहसील पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, २ कोटी रुपयांच्या व्यवहारासह शासकीय प्रकल्पांची कागदपत्रे, आरोपींची भूमिका आणि आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी सुरू आहे.

Don`t copy text!