Home Breaking News अकोट तालुक्यातील रेल येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट?

अकोट तालुक्यातील रेल येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट?

झुकलेल्या स्लॅबला टेका दिल्याचा आरोप; चौकशी होईपर्यंत बिल रोखण्याची ग्रामपंचायत सदस्याची मागणी

 

कुशल भगत 

 

अकोट : अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत रेल येथे शासकीय निधीतून सुरू असलेल्या अंगणवाडी क्र. ४ च्या इमारत बांधकामात गंभीर तांत्रिक त्रुटी व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्लॅब टाकल्यानंतर तो खाली झुकल्याने खालून टेका देऊन सरळ करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला असून, या बांधकामाची वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यां मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराचे देयक (बिल) अदा करू नये, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य हर्षल रघुनाथ कोल्हे यांनी गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समिती अकोट यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

नक्की प्रकार काय?

अंगणवाडी क्र. ४ चे बांधकाम सार्वजनिक निधीतून होत असून ते मंजूर अंदाजपत्रक, आराखडा व निश्चित तांत्रिक मापदंडानुसार होणे आवश्यक आहे.मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान स्लॅबचा काही भाग खाली आल्याचे व लेव्हल बिघडल्याचे निदर्शनास आले.हा प्रकार लपवण्यासाठी स्लॅबला खालून आधार/टेका देऊन सरळ करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे.

 

यामुळे इमारतीची संरचनात्मक मजबुती (Structural Stability), कॉंक्रीटची गुणवत्ता, लोखंडी सळयांचे प्रमाण (Reinforcement), स्लॅबची जाडी व शटरिंग सिस्टीम* या सर्व बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही इमारत भविष्यात लहान मुलांच्या वापरासाठी अंगणवाडी म्हणून वापरली जाणार असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

 

संबंधित अभियंत्याच्या भूमिकेवर शंका

 

बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त असलेल्या शासकीय अभियंता किंवा तांत्रिक अधिकाऱ्याने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले असून कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही त्यामुळे या प्रकरणात स्थानिक पातळीवरील दबावाशिवाय निष्पक्ष व स्वतंत्र वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणे अत्यावश्यक असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

तक्रारदाराच्या मुख्य १० मागण्या

 

स्वतंत्र पथकाद्वारे स्थळ पाहणी

अंगणवाडी क्र. ४ च्या बांधकामाची तात्काळ स्वतंत्र वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत पाहणी व्हावी

गुणवत्ता चाचणी

आवश्यक असल्यास कॉंक्रीट व स्लॅबची वैज्ञानिक गुणवत्ता चाचणी (Laboratory Quality Test) करून अहवाल घेण्यात यावा

दस्तऐवजांची तपासणी

कामाचे Measurement Book (MB), मंजूर अंदाजपत्रक, Technical Sanction, Administrative Approval, Work Order व मोजमाप बिलांची सखोल तपासणी करण्यात यावी देयक स्थगिती: बांधकाम पूर्णपणे सुरक्षित व मंजूर तांत्रिक मापदंडानुसार असल्याचे स्पष्ट होईपर्यंत कंत्राटदाराचे पुढील किंवा अंतिम बिल अदा करू नये

दोषींवर कारवाई व वसुली त्रुटी किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व आर्थिक कारवाई करून शासकीय निधीच्या नुकसानाची वसुली करण्यात यावी

 

त्रुटी झाकण्यापासून रोखणे

 

तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत बांधकामाच्या पुढील टप्प्यातील काम थांबवण्यात यावे, जेणेकरून सध्याच्या त्रुटी झाकल्या जाणार नाहीत अहवाल मिळणे: तक्रारीवर केलेल्या कारवाईचा व स्थळ पाहणीचा लेखी अहवाल तक्रारदारास उपलब्ध करून द्यावा

प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी न केल्यास उपलब्ध प्रशासकीय व कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य हर्षल कोल्हे यांनी दिला आहे .

Don`t copy text!