Home Breaking News अकोल्यात कृषी विभागाची मोठी कारवाई; ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द, ३...

अकोल्यात कृषी विभागाची मोठी कारवाई; ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द, ३ निलंबित

Akola News
प्रतिकात्मक फोटो
अकोला | श्रीकांत पाचकवडे
Akola News : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी अकोला जिल्हा कृषी विभागाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी करून गंभीर अनियमितता आढळलेल्या ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत, तर ३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून कृषी विभागाने स्पष्ट संदेश दिला आहे की, शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान १६ कृषी सेवा केंद्रांमध्ये विविध प्रकारच्या गंभीर त्रुटी व नियमभंग आढळून आले. संबंधित विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन सुनावणीची संधी देण्यात आली. मात्र अनेक केंद्रांकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने कृषी विभागाने कठोर निर्णय घेत कारवाई केली.
या कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
कृषी विभागाने खालील सात केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत :
राय कृषी सेवा केंद्र, बोर्डी (ता. अकोट)
मोहन ट्रेडर्स, अकोली जहाँगीर
महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, तळेगाव बु. (ता. तेल्हारा)
शिवशक्ती ॲग्रोटेक, सस्ती (ता. पातूर)
शेतकरी कृषी सेवा केंद्र, खानापूर रोड, पातूर
बळीराजा कृषी सेवा केंद्र, वाडेगाव
जगदंब अॅग्रो एजन्सीज व अॅग्रोटेक, बादलापूर
तीन केंद्रांवर तात्पुरती निलंबनाची कारवाई
काही केंद्रांमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर खालील केंद्रांचे परवाने निश्चित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत :
आपलं ग्रोमर कृषी सेवा केंद्र, निंबा फाटा (ता. बाळापूर) – १ महिना
शेतकरीपुत्र कृषी सेवा केंद्र, वारखेड (ता. तेल्हारा) – २ महिने
मातोश्री कृषी सेवा केंद्र, कापशी रोड – १ महिना
याशिवाय इतर सहा कृषी सेवा केंद्रांना गंभीर ताकीद देऊन भविष्यात नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तपासणीत उघडकीस आलेल्या गंभीर अनियमितता
तपासणीदरम्यान अनेक केंद्रांमध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. विशेषतः:
‘e-PoS’ यंत्रातील साठा आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये मोठी तफावत
दुकानांमध्ये साठा फलक व दर फलक अद्ययावत नसणे
शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे किंवा चुकीच्या नमुन्यात बिले देणे
परवाना व नोंदणी प्रमाणपत्र दुकानात प्रदर्शित न करणे
विक्री व्यवहारांची योग्य नोंद न ठेवणे
या बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.
शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
कृषी विभागाने शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही खरेदी करताना पक्के बिल घेणे बंधनकारक असून बिलावर लॉट नंबर, बॅच नंबर, उत्पादनाची किंमत आणि विक्रेत्याची माहिती तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच केवळ नोंदणीकृत आणि विश्वासार्ह कंपन्यांची उत्पादने खरेदी करावीत, असेही सांगण्यात आले आहे.
तक्रार कुठे कराल?
शेतकऱ्यांकडून जादा दर आकारला जात असल्यास, काळाबाजार होत असल्याचा संशय असल्यास किंवा बिल देण्यास नकार दिल्यास संबंधित पंचायत समिती अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षात तात्काळ लेखी तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“काळाबाजार आणि साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही” – डॉ. मुरली इंगळे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना सांगितले की, खरीप हंगामात बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीत कोणत्याही प्रकारची अनियमितता सहन केली जाणार नाही. साठेबाजी, जादा दर आकारणी, लिंकिंग किंवा शेतकऱ्यांची फसवणूक आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाईसोबतच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. आगामी काळात जिल्हाभर तपासणी मोहिमा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Don`t copy text!