श्रीकांत पाचकवडे
अकोला : प्रभाग क्र. ८ हा पूर्वी ग्रामीण भागाचा हिस्सा होता. मात्र अकोला महानगराच्या विस्तारामध्ये या भागाचा समावेश करण्यात आला असला तरी अपेक्षित असा विकास अद्याप झालेला नाही. परिणामी, येथील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आजही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रभागात पाणीटंचाईचा ज्वलंत प्रश्न लक्षात घेता गोळ्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक मनोज पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
जुने शहरातील प्रभाग क्रमांक आठ या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पूर्वी ग्रामीण भागासाठी टाकण्यात आलेली पीव्हीसी पाईपलाईन आता जीर्ण झाली असून ती वारंवार फुटत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो आणि अनेक भागांमध्ये नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नाही.
दरम्यान, महानगरात समावेश झाल्यानंतर प्रभाग क्र. ८ ची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा अपुरी ठरत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
यामुळे प्रभागातील विविध ठिकाणी नवीन, मजबूत पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यात यावी व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी नम्र परंतु ठाम मागणी नगरसेवक मनोज पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. या संदर्भात महापालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनाही त्यांनी पत्र देत पाणी प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी केली असून सभापती अग्रवाल यांनी यावर तत्काळ उपायोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले.





