Home Breaking News लाडकी बहीण योजनेतील अडचणींवर आमदार साजिद पठाण आक्रमक; महिला व बाल विकास...

लाडकी बहीण योजनेतील अडचणींवर आमदार साजिद पठाण आक्रमक; महिला व बाल विकास कार्यालयात धडक

Akola News
ई-केवायसीसाठी महिलांची हेलपाटे; लाभार्थींना होणाऱ्या त्रासावरून सरकारवरही साधला निशाणा
अकोला | श्रीकांत पाचकवडे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे महिलांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी बुधवारी महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट देत प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लाभार्थी महिलांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रियेसाठी महिलांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याच्या तसेच वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी आमदार पठाण यांच्याकडे पोहोचल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट कार्यालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपस्थित महिलांनी तांत्रिक अडचणी, कागदपत्र पडताळणीतील विलंब आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या प्रतिसादाबाबत नाराजी व्यक्त केली.
महिलांशी संवाद साधल्यानंतर आमदार पठाण यांनी राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवली. “लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली. मात्र आज अनेक पात्र महिलांना विविध कारणांवरून अपात्र ठरविले जात आहे. जर महिलांना लाभ द्यायचाच नव्हता, तर ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? निवडणुकीपुरतीच ही योजना राबविण्यात आली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लाखो महिलांना योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार गंभीर असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शासकीय योजनांचा लाभ मिळविताना महिलांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असेल, तर त्या योजनेचा मूळ हेतूच फोल ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार पठाण यांनी महिलांशी सन्मानपूर्वक आणि संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रलंबित अर्जांचा जलद निपटारा करून ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.
लाभार्थी महिलांची गैरसोय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी योजनेतील अडचणी त्वरित दूर न झाल्यास आगामी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करून सरकारला जाब विचारला जाईल, असा इशाराही दिला.
यावेळी अकोला शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कशिश खान, नगरसेविका सुवर्णरेखा जाधव, ताबिंदा अहमद, शहाना शेख, रेखा डोंगरे, रंजना चावरे, दीक्षा चावरे, कुसुम चव्हाण यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि योजनेपासून वंचित राहिलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
“महिलांची फरफट थांबवा”
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या महिलांना वारंवार कार्यालयात येण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. लाभार्थींना वेळेवर सेवा मिळाली पाहिजे. अन्यथा हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून सरकारकडून उत्तर मागितले जाईल, असा इशारा आमदार साजिद खान पठाण यांनी दिला.
Don`t copy text!