श्रीकांत पाचकवडे
अकोला : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या हक्कांसाठी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या कार्यावर संशोधन करून अकोल्यातील सौ. सरिता विजय वाकोडे यांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. शिवसेनेवर डॉक्टरेट मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
अकोल्याच्या लेकीची ऐतिहासिक कामगिरी; शिवसेनेवर डॉक्टरेट मिळविणारी पहिली महिला
अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे त्यांनी “शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन : विशेष संदर्भ – मुंबई विभाग (कालखंड १९६० ते २०१९)” या विषयावर सुमारे १००० पानी प्रबंध सादर केला होता. विद्यापीठाने हा प्रबंध मान्य करत उपकुलसचिव सौ. मीनल मालधुरे यांच्या हस्ते त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांचे पती विजय वाकोडे उपस्थित होते.
सुमारे सहा वर्षांच्या अथक परिश्रमातून त्यांनी हा संशोधनप्रबंध पूर्ण केला. विशेष म्हणजे, त्यांनी हा प्रबंध आपल्या पूर्वाश्रमीच्या कु. सरला रामराव पाटील या नावाने सादर केला होता. या संशोधनासाठी त्यांना डॉ. एस. बी. डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुंबईत त्यांचा सत्कार करून गौरव केला. तसेच शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनीही त्यांचे अभिनंदन करत, “या कामगिरीमुळे अकोला जिल्ह्याचा आणि शिवसेनेच्या विचारांचा गौरव वाढला आहे,” असे मत व्यक्त केले.
सौ. वाकोडे या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अकोला जिल्हा महिला संघटिका असून, त्या पाटील समाज महिला मंडळाच्या जिल्हा संघटिका म्हणूनही कार्यरत आहेत. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवून आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल अकोला जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






