हजारो रुपये खर्चून फुलवलेले पीक उद्ध्वस्त; संतप्त शेतकऱ्यांकडून कारवाई आणि आर्थिक मदतीची मागणी
कुशल भगत | OTT News
अकोट : निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या अडचणीत आता अज्ञात व्यक्तीच्या कृत्याने भर पडली आहे. अकोट तालुक्यातील कवठा येथे शेतकरी रामेश्वर मरकाडे यांच्या शेतातील सुमारे एक एकर उभी कपाशी उपटून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर मरकाडे यांनी कपाशीच्या पिकासाठी हजारो रुपये खर्च करून मेहनतीने शेतीची मशागत केली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने शेतातील सुमारे एक एकर कपाशीचे पीक उपटून फेकून दिल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. ऐन पीक वाढीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
आधीच प्रतिकूल हवामान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे गणित बिघडलेले असताना, अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गंभीर झाले आहे. शेतीत केलेला खर्च, त्यासाठी घेतलेली मेहनत आणि अपेक्षित उत्पन्न या सर्वांवर या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी
या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, नुकसान झालेल्या शेताची पाहणी करून पंचनामा करावा आणि संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर मरकाडे यांना आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्याच्या उभ्या पिकाची नासधूस करणाऱ्या या प्रकारामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे का आणि प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






