Home Breaking News कुही : मांढळ – पचखेडी रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ वाघाचे दर्शन ;...

कुही : मांढळ – पचखेडी रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ वाघाचे दर्शन ; मांढळ शिवारात दहशतीचे वातावरण 

कुही : मांढळ – पचखेडी रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ वाघाचे दर्शन ; मांढळ शिवारात दहशतीचे वातावरण 

कुही : आज दि.४ मार्चला सकाळी मांढळ – पचखेडी रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मांढळच्या शिवारात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये एकाच वेळी भीती आणि उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास पचखेडी मार्गावर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या परिसरात एक पूर्ण वाढ झालेल्या वाघाला पाहिले गेले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाने रस्त्यावरून संथ गतीने चालत रस्त्याच्या कडेला झुडुपांच्या बाजूला असलेल्या कापसाच्या शेतामध्ये शिरकाव केला. ​वाघाच्या या दर्शनामुळे परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. ​सकाळच्या वेळेस शेतात कामाला जाणाऱ्या महिला मजुरांनी घराबाहेर पडण्यास धजावन्याची हिम्मत झाली नाही. विशेषतः दुचाकीस्वारांनी या मार्गावरून प्रवास करताना मोठी सावधगिरी बाळगली आहे. दुसरीकडे, गावात वाघाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेक हौशी तरुणांनी वाघ पाहण्यासाठी पेट्रोल पंप परिसराकडे धाव घेतली, ज्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

​वनविभागाने या घटनेची दखल घेतली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ‘परिसरात वाघाचे पाऊलखुणे तपासले जात आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे आणि शेतात जाताना समूहाने जावे. अफवांवर विश्वास ठेवू असे आवाहन नागरिकांना केले आहे. पचखेडी – मांढळ परिसरात वाघाच्या सततच्या दर्शनामुळे आता वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा किंवा त्याचा माग काढून नागरिकांना सुरक्षित करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Don`t copy text!