श्रीकांत पाचकवडे
अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (ladki bahin yojna) योजनेत सुमारे 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याची बाब समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जावेद जकरिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात जकरिया यांनी म्हटले आहे की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हजारो पुरुषांनी घेतल्याची माहिती अत्यंत गंभीर असून, शासनाच्या यंत्रणेत झालेल्या त्रुटींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
महिलांसाठी असलेल्या योजनेचा लाभ पुरुषांना कसा मिळाला, अर्ज पडताळणी, ई-केवायसी, डेटा एंट्री आणि निधी वितरण प्रक्रियेत कोणत्या स्तरावर हलगर्जीपणा झाला, याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, ज्या 14 हजार पुरुषांनी चुकीची माहिती, खोटी कागदपत्रे किंवा दिशाभूल करून योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांच्याकडून लाभाची संपूर्ण रक्कम वसूल करून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही त्यांनी नमूद केले.
जकरिया यांनी पुढे म्हटले आहे की, या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा इतर व्यक्तींचे संगनमत आढळल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. राज्याच्या तिजोरीतील जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्यांना कोणतीही सूट देऊ नये आणि संपूर्ण चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राजकीय आणि प्रशासकीय परिणाम
लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना मानली जाते. अशा योजनेत पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन करून पुरुषांनी लाभ घेतल्याची बाब समोर आल्यास, लाभार्थी पडताळणी यंत्रणा, डिजिटल प्रमाणीकरण प्रक्रिया आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.






