पुण्यातील कन्सल्टन्सी फर्मशी संबंधित अकोल्यातील तिघांविरुद्ध नागपुर तहसील पोलिसांत गुन्हा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : शासकीय योजनांमधील कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागपूरस्थित इझीस्पिट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची तब्बल २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील पाथवे बिझनेस कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित अकोल्यातील तिघांविरुद्ध नागपूरच्या तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.
राहुल गोपाळराव शिरस्कर (४१), रोहित दामोधर रांदळ (४०) आणि अंकुश हरिकिसन अग्रवाल (४२) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही अकोल्यातील रहिवासी असून सध्या पिंपरी-चिंचवड येथे व्यवसाय करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
कोट्यवधींच्या शासकीय प्रकल्पांचे आमिष
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी इझीस्पिट सोल्यूशन्सच्या संचालकांशी संपर्क साधून शासनाच्या विविध योजनांमधील मोठे प्रकल्प मिळवून देण्याचे आश्वासन दिले. विश्वास संपादन करण्यासाठी शासकीय प्रकल्पांशी संबंधित कागदपत्रेही दाखविण्यात आली.
प्रकल्प मिळवून देण्याच्या मोबदल्यात कंपनीकडून २ कोटी रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतरही आश्वासन दिल्याप्रमाणे कोणताही शासकीय प्रकल्प मिळवून देण्यात आला नाही.
पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ
प्रकल्प न मिळाल्याने कंपनीने आरोपींकडे आपली रक्कम परत मागितली. मात्र, पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीच्या संचालक रितू भारत मल्होत्रा (३१) यांनी तहसील पोलिसांत तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
तक्रारीच्या आधारे तहसील पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. आरोपींच्या संभाव्य ठिकाणांची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
‘स्ट्राइक ऑफ’ कंपनीचा मुद्दाही चर्चेत
दरम्यान, पाथवे बिझनेस कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना २६ एप्रिल २०२३ रोजी झाल्याची माहिती उपलब्ध आहे. कंपनीचा नोंदणीकृत पत्ता चिंचवड, पिंपरी-चिंचवड, पुणे असा असून CIN U70200PN2023PTC220019 आहे. उपलब्ध कॉर्पोरेट नोंदींमध्ये कंपनीची स्थिती ‘Strike Off’ अशी दर्शविली जात असल्याने या बाबीचीही तपास यंत्रणेकडून पडताळणी होणे अपेक्षित आहे.
२ कोटींचा व्यवहार, शासकीय प्रकल्पांच्या नावाने दाखविण्यात आलेली कागदपत्रे, कंपनीची भूमिका आणि आरोपींचे आर्थिक व्यवहार याबाबत तहसील पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, आरोपी फरार असल्याने या प्रकरणाकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.






