Home राजकीय “DPDC” मध्ये अकोला पश्चिमच्या प्रश्नांवर आमदार साजिद खान पठाण आक्रमक!

“DPDC” मध्ये अकोला पश्चिमच्या प्रश्नांवर आमदार साजिद खान पठाण आक्रमक!

आमदार साजिद खान पठाण
आमदार साजिद खान पठाण

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा आणि विकासकामांना गती मिळावी यासाठी आमदार साजिद खान पठाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेत विविध महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी रस्ते, आरोग्य, क्रीडा, महिला कल्याण, पोलीस प्रशासन आणि पुनर्वसनाशी संबंधित विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधले.

तपे हनुमान मंदिर, अग्रसेन चौक ते शहीद अब्दुल हमीद चौक या शहरातील अत्यंत वर्दळीच्या मार्गाची दयनीय अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे सांगत, या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासासाठीही विशेष निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

टीबी लॅब सुरू करण्याची मागणी

अकोला शहरासाठी २०२१ मध्ये मंजूर झालेली अत्याधुनिक क्षयरोग (टीबी) तपासणी प्रयोगशाळा अद्याप कार्यान्वित न झाल्याचा गंभीर मुद्दा आमदार पठाण यांनी उपस्थित केला. आवश्यक यंत्रसामग्री आणि ११ पदांना मंजुरी मिळालेली असतानाही महानगरपालिका व जिल्हा क्षयरोग विभागातील समन्वयाअभावी प्रयोगशाळा सुरू न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा विषय तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

क्रीडा स्पर्धांद्वारे स्थानिक खेळाडूंना संधी

जिल्हा क्रीडा विभागामार्फत विविध क्रीडा आणि कुस्ती स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे स्थानिक प्रतिभेला संधी मिळून युवकांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

‘लाडकी बहीण’ लाभार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अनेक पात्र महिलांचे केवायसी अपूर्ण असल्याने त्यांना लाभ मिळालेला नसल्याचे निदर्शनास आणून देत, केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आमदार पठाण यांनी केली. तसेच अल्पसंख्याक विभागामार्फत मूलभूत रस्ते विकासाची कामे हाती घेण्याचीही मागणी त्यांनी केली.

जुन्या शहरातील पोलीस ठाण्याच्या स्थलांतराचा मुद्दा

जुन्या शहरातील पोलीस ठाणे गर्दीच्या भागात असल्यामुळे नागरिक आणि भाविकांना वारंवार गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगत, हे पोलीस ठाणे हरिहर पेठ परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली.

२५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

वार्ड क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात रेल्वे मार्गालगत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर रेल्वे प्रशासनाने १ जून रोजी अतिक्रमण हटाव कारवाई केली. या कारवाईमुळे सुमारे २०० कुटुंबे बेघर झाली असून गडंकी पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील आणखी ५० कुटुंबांनाही फटका बसला आहे.

या एकूण २५० कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना ई-क्लास जमिनीवर घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी ठोस मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी केली. यावर पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल आणि पुनर्वसनासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांमुळे अकोला पश्चिममधील नागरिकांच्या अपेक्षांना नवे बळ मिळाले असून प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका आमदार साजिद खान पठाण यांनी यावेळी स्पष्ट केली.

Don`t copy text!