Home Breaking News भूमी अभिलेख उपअधीक्षकास 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेडया

भूमी अभिलेख उपअधीक्षकास 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेडया

भूमी अभिलेख उपअधीक्षकास 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेडया

नागपूर : थ्रिलर चित्रपटांमधून प्रेरणा घेत 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा सिनेस्टाईल कट नागपूर पोलिसांनी वेळेवर कारवाई करत उधळून लावला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या प्रकरणात भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. बहिणीच्या लग्नासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या मुख्य आरोपीने चित्रपटातील पद्धतींचा अवलंब करत हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार प्रकाश ढगे हे भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. 17 डिसेंबर रोजी भंडाऱ्यातील काम आटोपून नागपूरकडे परत येत असताना वेळाहरी बायपास रोडवर आरोपींनी ढगे यांची कार अडवली. कारच्या मागील काच आणि समोरील दरवाज्याच्या काचा फोडून भीतीचे वातावरण निर्माण करत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर 19 डिसेंबर रोजी ढगे यांना अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला. “तुला मारण्यासाठी 20 लाखांची सुपारी देण्यात आली आहे. जीव वाचवायचा असेल तर 50 लाख रुपये दे,” अशी थेट धमकी देत आरोपींनी जबलपूर रिंगरोडवरील महादेव ढाब्यावर पैसे आणण्यास सांगितले. प्रसंगावधान राखत ढगे यांनी तात्काळ बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सापळा रचला. बनावट नोटांनी भरलेली बॅग ढगे यांच्याकडे देऊन ठरलेल्या ठिकाणी पाठवण्यात आले. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी बॅग घेऊन पसार झाले. त्यानंतर आरोपींनी सतत सिमकार्ड आणि मोबाईल फोन बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पैसे आणण्यास सांगण्यास सुरुवात केली. 29 डिसेंबर रोजी पुन्हा धमकीचा फोन करून ढगे आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

पोलिसांनी तांत्रिक तपास करत मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत छापे टाकून अखेर सर्व आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतुल अनिल तागडे (वय ३०, रा. देवरी, गोंदिया), राहुल मीताराम पटले (वय २१), हिंदुस्तान वासुदेव रामटेके (वय २७), निखिल राजू नांदेकर (वय २८) आणि प्रेक्षा बाबू कांबळे (वय ३०) यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल तागडे हा देवरी येथे मोबाईल शॉपी चालवतो. तो बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. प्रेक्षा कांबळे ही त्याची मावस बहीण असून ती भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. तिनेच कार्यालयीन माहितीच्या आधारे ढगे यांच्याकडे मोठी अवैध संपत्ती असल्याची माहिती तागडेला दिल्याचा आरोप आहे. याच माहितीवरून ढगे यांना ‘टार्गेट’ करून सिनेस्टाईल खंडणीचा कट रचण्यात आला. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Don`t copy text!