श्रीकांत पाचकवडे
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करत मोठा दिलासा दिला असला, तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अपुरे असल्याची भूमिका आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मांडली आहे. हे अनुदान वाढवून १ लाख रुपये करण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यात विधानपरिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू असताना शासनाकडून नवीन जनहिताच्या घोषणा टाळल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासोबतच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यालाही मंजुरी देण्यात आली.
मात्र, या निर्णयावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, “नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच सर्वाधिक प्रोत्साहन मिळायला हवे. शेतीचा वाढता खर्च, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशा वेळी ५० हजार रुपयांचे अनुदान अपुरे ठरत असून ते किमान १ लाख रुपये करणे गरजेचे आहे.”
कर्जमाफीमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला, तरी प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त करत बच्चू कडूंनी सरकारला पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत असताना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. बच्चू कडूंच्या मागणीमुळे सरकार या अनुदानाच्या रकमेत वाढ करणार का, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





