Home Breaking News सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मेगा कृषी कर्ज मेळावा उत्साहात

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मेगा कृषी कर्ज मेळावा उत्साहात

श्रीकांत पाचकवडे
शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कोट्यवधींच्या कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकोला विभागीय कार्यालयातर्फे आयोजित ‘देशव्यापी मेगा कृषी कर्ज पोहोच कार्यक्रम’ शनिवारी औद्योगिक वसाहतीतील हॉटेल बारोमासी येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार Anup Dhotre यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत कृषी कर्जाचा लाभ पोहोचविण्यासाठी बँकेने विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत
शेतकरी समृद्धी, बँक प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात शेकडो शेतकरी, कृषी उद्योजक, उद्योग प्रतिनिधी आणि बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अकोला क्षेत्रीय प्रमुख पंकज कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत करून बँकेच्या विविध कृषी व उद्योजकता विकास योजनांची माहिती दिली. यावेळी मुंबई मुख्य कार्यालयाचे डीजीएम दिलीप बरनवाल आणि नयन सिन्हा यांनी बँकेच्या पत धोरणांबाबत मार्गदर्शन केले.
मेळाव्यात पीक कर्ज, कृषी पूरक व्यवसाय, कृषी यंत्रसामग्री, पशुपालन तसेच विविध अनुदान योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सरफराज आलम यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध कर्ज योजनांचे सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
उपविभागीय कृषी अधिकारी विवेक बिऱ्हाडे यांनी शासकीय कृषी योजना आणि बँकिंग क्षेत्रातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. तर कृषी विज्ञान केंद्राचे संचालक उमेश ठाकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादन वाढ आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोचण्याचे मार्ग स्पष्ट केले.
एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे सचिव नितीन बियाणी, अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल तसेच अकोला डाळ मिल असोसिएशनचे शांतीलाल भाल यांनी शेती व उद्योग यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी बँकेने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले.
मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे शेतकरी, नवउद्योजक, कृषी क्लस्टर सदस्य, सीए आणि डीएसए प्रतिनिधींना कोट्यवधी रुपयांच्या कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण. यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या उद्योग व शेती विकासाच्या योजना प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निलेश मुंधेकर यांनी केले. कृषी क्षेत्राला आर्थिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा मेगा कृषी कर्ज मेळावा महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Don`t copy text!