श्रीकांत पाचकवडे
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक आणि संतापजनक घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी आक्रमक भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईतील मंत्रालयात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका आदिवासी महिलेने आपल्या गंभीर आजारी पतीला उपचारासाठी जीएमसी रुग्णालयात आणले होते. मात्र, रुग्णवाहिका, स्ट्रेचर किंवा इतर आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध न झाल्याने तिला स्वतःच्या पाठीवर पतीला घेऊन रुग्णालय परिसरातील विविध विभागांमध्ये फिरावे लागले. विशेष म्हणजे, या वेळी डॉक्टर, सुरक्षा रक्षक आणि वॉर्ड बॉय उपस्थित असूनही मदतीसाठी कोणीही पुढे आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या अमानुष प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार साजिद खान पठाण यांनी जीएमसी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रुग्णसेवा हे रुग्णालयाचे प्रमुख कर्तव्य असताना एका गरीब आदिवासी महिलेला अशी वागणूक मिळणे अत्यंत दुर्दैवी व निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून जबाबदार आढळणाऱ्या डीन, संबंधित डॉक्टर, सुरक्षा रक्षक आणि वॉर्ड बॉय यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रुग्णालय प्रशासनातील सातत्याने समोर येणाऱ्या त्रुटी लक्षात घेता जीएमसीच्या डीन यांना तत्काळ निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, आमदार पठाण यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे जीएमसी प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिक, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार का आणि रुग्णालय व्यवस्थेत सुधारणा होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





