Home Breaking News अकोल्यात अवैध सावकारी विरोधात सहकार विभागाची मोठी धडक कारवाई; २८ ठिकाणी छापे

अकोल्यात अवैध सावकारी विरोधात सहकार विभागाची मोठी धडक कारवाई; २८ ठिकाणी छापे

११ तक्रारदारांच्या तक्रारींवरून संयुक्त पथकांची कारवाई; कोरे चेक, बॉण्ड, खरेदीखतांसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : शहरात अवैध सावकारी सुरू असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने मोठी संयुक्त कारवाई केली. अकोला शहर व परिसरातील विविध ठिकाणी एकाच वेळी २८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या मोहिमेत अकोला, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांतील सहकार विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पंच आणि पोलीस अशा सुमारे २३० ते २४० जणांचा सहभाग होता. अमरावती विभागातील सहकार विभागाच्या आतापर्यंतच्या कारवायांमध्ये ही सर्वांत मोठ्या कारवायांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले.

 

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम १६ अन्वये ही कारवाई करण्यात आली. एकूण ११ तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली.

 

चार जिल्ह्यांतील पथकांचा सहभाग

 

जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी चार जिल्ह्यांतील प्रशासन व लेखापरीक्षण विभागाचे सुमारे १२० अधिकारी-कर्मचारी, ४० पंच, तसेच पोलीस विभागातील २२ अधिकारी आणि ४४ महिला व पुरुष पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

 

विविध पथकांनी संबंधितांच्या निवासस्थानी, कार्यालयांत तसेच अन्य ठिकाणी तपासणी केली. संपूर्ण कारवाई पोलीस बंदोबस्तात आणि पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली.

 

महत्त्वाची कागदपत्रे जप्त

 

छाप्यांदरम्यान इसार पावत्या, कोरे चेक, कोरे बॉण्ड, मूळ व छायांकित खरेदीखत, डायऱ्या, ताबा व विक्री पावत्या, करारनामे, गहाणखते, सातबारा उतारे, रोकडवह्या आणि खातावह्या यांसह विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

 

या कागदपत्रांच्या आधारे संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे. सावकारीच्या व्यवहारांत नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची पडताळणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे.

 

दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई

 

जप्त कागदपत्रांची चौकशी आणि पडताळणी केल्यानंतर तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

 

सध्या ही कारवाई तक्रारींच्या आधारे करण्यात आली असून, संबंधित व्यक्तींविरुद्धचे आरोप चौकशीअंती सिद्ध होणे आवश्यक आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

 

या मोहिमेस विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन, जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. अमरावतीचे जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार, बुलढाण्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण आणि वाशिमचे जिल्हा उपनिबंधक एम. एस. लटपटे यांनीही आपल्या जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून दिले.

 

कारवाईचे नियोजन अकोला तालुक्याच्या उपनिबंधक ज्योती मलिये-राऊत यांनी केले. या मोहिमेत विविध पथकप्रमुख आणि सहकार विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

सावकारग्रस्त नागरिकांना तक्रारीचे आवाहन

 

अवैध सावकारीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांनी केले आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवून तक्रारींची दखल घेतली जाईल, असेही विभागाकडून सांगण्यात आले.

 

अवैध सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, जप्त कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित व्यवहारांतील अनियमिततेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Don`t copy text!