Home Breaking News “नेते राजीनामा देतात तर अधिकारी का नाही?” — अकोला रुग्णालय प्रकरणावर जावेद...

“नेते राजीनामा देतात तर अधिकारी का नाही?” — अकोला रुग्णालय प्रकरणावर जावेद जकरिया यांचा सवाल

javed jhakariya
तक्रारकर्ते जावेद झकारिया
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका आदिवासी महिलेने आपल्या आजारी पतीला पाठीवर उचलून उपचारासाठी मदतीच्या शोधात रुग्णालय परिसरात फिरावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. या घटनेला आरोग्य यंत्रणेचे गंभीर अपयश संबोधत त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जावेद जकरिया यांनी म्हटले की, एखाद्या दुर्घटनेनंतर किंवा प्रशासकीय त्रुटी समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, मात्र सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्या जबाबदारीसाठी उत्तरदायी धरले गेले पाहिजे. “जेव्हा नेते राजीनामा देतात, तेव्हा अधिकारी का नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या मते, एका आदिवासी महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात फिरावे लागणे ही केवळ दुर्दैवी घटना नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशून्यतेचे प्रतीक आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने अकोल्याची प्रतिमा राज्यासह देशभरात मलिन झाली असून सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जकरिया यांनी नमूद केले की, रुग्णालयात व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि इतर अत्यावश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. जर या सुविधा रुग्णांना मिळत नसतील आणि त्यामुळे त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असतील, तर त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले गेले पाहिजे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी तसेच निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने सरकारी रुग्णालयांमधील सुविधा, मनुष्यबळ आणि व्यवस्थापन यामध्ये सुधारणा करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात कोणत्याही गरीब, आदिवासी किंवा गरजू कुटुंबाला अशा वेदनादायक आणि मानहानीकारक परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, असे आवाहनही जावेद जकरिया यांनी केले.
Don`t copy text!