Akola : विना नंबरप्लेट दुचाकीवरून प्रवास; तिघांविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
श्रीकांत पाचकवडे
अकोला : शहरात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान विना नंबरप्लेट दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांकडे कोयता आढळून आला. या कोयत्याचा माग काढत पोलिसांनी लोहा बाजारातील एका हार्डवेअर दुकानाची तपासणी केली असता, तेथून तब्बल ६२ कोयते जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ६३ कोयते आणि दुचाकी असा ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाकाबंदीत दुचाकीच्या डिक्कीत आढळला कोयता
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार, वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून अकोला शहरात नाकाबंदी करण्यात आली होती.
रात्री सुमारे ८ वाजता सरकारी बगीचासमोर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी भूषण सोळंके आणि अश्विन चव्हाण कर्तव्यावर असताना, त्यांना विना नंबरप्लेट सुझुकी अॅक्सेस मोपेडवरून दोघे येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, डिक्कीत लोखंडी कोयता आढळला.
मुजम्मील खान युनूस खान (वय २३, रा. सोनटक्के प्लॉट, जुने शहर, अकोला) आणि सैय्यद फिरोज सैय्यद जानी (वय २६, रा. नेहरूनगर, खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) अशी त्यांची नावे आहेत.
कोयत्याचा माग काढत दुकानावर छापा
जप्त केलेला कोयता शालिनी टॉकीजसमोरील लोहा बाजारातील एका दुकानातून खरेदी केल्याची माहिती संबंधितांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पोलीस निरीक्षक संजय गवई, पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या पथकाने पंचांसमक्ष प्रिन्स हार्डवेअर या दुकानाची तपासणी केली.
शेतीची अवजारे आणि लोखंडी साहित्य विक्री करणाऱ्या या दुकानातून कोयत्यांनी भरलेली एक बोरी पोलिसांच्या हाती लागली. दुकानमालक आरिफ अहेमद खान उमर खान (वय ५२, रा. कोठडी बाजार, अकोला) याच्याकडून १२ हजार ४०० रुपये किमतीचे ६२ कोयते जप्त करण्यात आले.
६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी पुढील मुद्देमाल जप्त केला आहे.
६२ कोयते : किंमत १२,४०० रुपये
दुचाकीवरील कोयता : किंमत २०० रुपये
विना नंबरप्लेट सुझुकी अॅक्सेस मोपेड : किंमत ५०,००० रुपये
अशा प्रकारे एकूण ६३ कोयते आणि एक दुचाकी असा ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी भूषण सोळंके यांच्या लेखी फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियमातील कलम ४ व २५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) अन्वये सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार
संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वीही आर्म्स अॅक्ट आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक संजय गवई, पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येउल, पोलीस कर्मचारी शैलेश घुगे, अमोल गायकवाड, आकाश जामोदे तसेच वाहतूक शाखेचे भूषण सोळंके आणि अश्विन चव्हाण यांनी सहभाग घेतला.






