Home Breaking News अकोला शहरातील बेशिस्त वाहतूक येणार आता तालावर, अकोला शहर वाहतूक शाखेची धुरा...

अकोला शहरातील बेशिस्त वाहतूक येणार आता तालावर, अकोला शहर वाहतूक शाखेची धुरा आता विलास पाटील यांच्याकडे

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : शहरातील विस्कळीत होत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रशासकीय फेरबदलात धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून ख्याती मिळवलेले विलास पाटील यांची शहर वाहतूक शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

 

दि. १० सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदली व पदस्थापनेचे आदेश काढण्यात आले. त्यामध्ये विलास पाटील यांच्याकडे शहर वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली.

 

गर्दीच्या चौकांमध्ये कोंडीची समस्या

 

अकोला शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील विविध अडथळ्यांमुळे अनेक भागांत वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. जठारपेठ, गांधी रोड, सिटी कोतवाली-बस्थानक परिसर, अकोला चौक, मोठी उमरी आणि सिव्हिल लाईन भागात विशेषतः गर्दीच्या वेळी वाहतुकीचा वेग मंदावतो.

 

त्यातच नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, फुटपाथचा वापर, रस्त्यालगतच्या हातगाड्या आणि इतर अडथळ्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट होते. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान नव्या वाहतूक प्रमुखांसमोर राहणार आहे.

 

शिस्तीसोबत जनजागृतीवरही भर

 

पदभार स्वीकारल्यानंतर विलास पाटील यांनी वाहतूक कोंडी कमी करणे, बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणणे आणि शालेय वेळेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे यांना प्राधान्य देण्याचे संकेत दिले.

 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतानाच नागरिकांमध्ये नियमांबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

फेरबदलानंतर अपेक्षा वाढल्या

 

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रशासकीय फेरबदलानंतर वाहतूक शाखेची जबाबदारी विलास पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शहरातील वाहतूक प्रश्नांवर अधिक परिणामकारक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग, नियमभंग आणि रस्त्यांवरील अडथळे यावर नव्या वाहतूक प्रमुखांची कारवाई किती प्रभावी ठरते, याकडे आता अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!