Home Breaking News उद्धवसेना ‘या’ मागणीसाठी रस्त्यावर उतरणार? पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत...

उद्धवसेना ‘या’ मागणीसाठी रस्त्यावर उतरणार? पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत आक्रोश मोर्चे; अकोल्यात २२ सप्टेंबरला आंदोलन

श्रीकांत पाचकवडे

अकोला : पावसाने सलग दीड महिन्यापासून दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील खरीप पिके संकटात आली आहेत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कपाशीचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत आक्रोश मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अकोल्यातील विश्रामगृहात शुक्रवारी आमदार तथा शिवसेना उपनेते नितीन देशमुख यांच्या पुढाकाराने अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाई यावर चर्चा करण्यात आली.

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उदासीन : नितीन देशमुख

महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळालेली नाही. कापूस आणि सोयाबीनला हमीभाव देण्याच्या आश्वासनाचीही त्यांनी सरकारला आठवण करून दिली.

 

शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही शिवसेनेची भूमिका आहे, असे सांगत देशमुख यांनी पाचही जिल्ह्यांमध्ये आंदोलनाची तयारी करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले.

 

बैठकीला संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, सहसंपर्कप्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, महिला आघाडी संपर्क संघटिका सागरताई पुरी, जिल्हा संघटिका डॉ. सरिता वाकोडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

 

पाच जिल्ह्यांत आंदोलनाचे वेळापत्रक

२१ सप्टेंबर — वाशिम

 

२२ सप्टेंबर — अकोला

 

२३ सप्टेंबर — यवतमाळ

 

२८ सप्टेंबर — अमरावती

 

२९ व ३० सप्टेंबर — बुलढाणा

 

अकोल्यातील मोर्चाला स्थानिक स्वराज्य भवन येथून सुरुवात होणार आहे.

 

भाजपच्या लोकप्रतिनिधींवर गोपाल दातकरांचा निशाणा

 

पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असताना भाजपचे स्थानिक खासदार आणि आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन बाळगत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केला. केंद्र व राज्यात सत्ता असूनही शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडल्या जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.

 

पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि चारा संकटाच्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन उद्धवसेना थेट रस्त्यावर उतरणार आहे.

Don`t copy text!