संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मिरगे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव; शेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
शेगाव : संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, शेगाव यांनी लिहिलेल्या ‘विचार संपदा’ या ललित गद्य ग्रंथाची महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशनासाठी निवड करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब असून, डॉ. मिरगे यांच्या लेखन गुणवत्तेवर शासनस्तरीय समितीने शिक्कामोर्तब केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने गुणवत्तापूर्ण साहित्यकृतींची प्रकाशनासाठी निवड केली जाते. यासाठी साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समितीकडून संबंधित ग्रंथांचे परीक्षण करण्यात येते. या प्रक्रियेत डॉ. ज्ञानेश्वर मिरगे यांच्या ‘विचार संपदा’ या ललित गद्य ग्रंथाला लेखन गुणवत्तेबाबत अनुकूल अभिप्राय प्राप्त झाला आहे.
पुढील महिन्यात ग्रंथ प्रकाशनाच्या दिशेने वाटचाल
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशनविषयक काम पुढील महिन्यात पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भातील कार्यालयीन पत्र मंडळाचे प्रपाठक श्री. रामेश्वर रोकडे यांनी पाठविले आहे. या निवडीमुळे डॉ. मिरगे यांच्या साहित्यिक कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, त्यांच्या साहित्यप्रवासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
संत साहित्याचा अभ्यास, वैचारिक लेखन आणि ललित गद्याच्या माध्यमातून विचारांची मांडणी करणाऱ्या डॉ. ज्ञानेश्वर मिरगे यांच्या ‘विचार संपदा’ ग्रंथाची शासनाच्या प्रकाशनासाठी झालेली निवड ही शेगावसह बुलढाणा जिल्ह्याच्या साहित्यिक क्षेत्रासाठी गौरवास्पद ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. ज्ञानेश्वर मिरगे यांचे साहित्यप्रेमी, वाचक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.






