शेतमालाला योग्य दर, पारदर्शक व्यवहार आणि आधुनिक सुविधांवर भर; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा विश्वास
श्रीकांत पाचकवडे
अकोला : माजी कृषिमंत्री, लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या शेतकरीहिताच्या विचारांचा वारसा पुढे नेत खामगाव येथे ‘भाऊसाहेब फुंडकर कृषी उत्पन्न खाजगी बाजार’ सुरू करण्यात आला आहे. नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर या बाजारपेठेचा भव्य लोकार्पण सोहळा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनीता पांडुरंगजी फुंडकर यांच्या शुभहस्ते पार पडला. या नव्या बाजारपेठेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी आधुनिक आणि सुविधायुक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.

स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. बळीराजाच्या घामाला योग्य दाम मिळावा, शेतमालाच्या विक्रीत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये आणि शेती व्यवसायाला बळ मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या याच विचारांना कृतीची जोड देत नव्या बाजारपेठेची उभारणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधांचा समावेश
शेतमालाची खरेदी-विक्री पारदर्शक पद्धतीने व्हावी, वजनात अचूकता राहावी आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेत व्यवहार करताना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी विविध सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या बाजारपेठेतील प्रमुख सुविधांमध्ये इलेक्ट्रॉनिक काट्याद्वारे शेतमालाचे अचूक वजन, प्रवेशद्वारावर अत्याधुनिक वे-ब्रिज, शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग, तसेच शेतकरी बांधवांच्या निवास आणि भोजनाची सोय यांचा समावेश आहे. याशिवाय व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र दुकाने, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या सुविधांमुळे शेतकरी, अडते आणि खरेदीदारांना एकाच ठिकाणी आवश्यक सोयी मिळण्यास मदत होणार आहे. परिणामी, बाजारपेठेतील व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य
या बाजारपेठेच्या लोकार्पणप्रसंगी भाजपचे प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर, नगराध्यक्षा अपर्णाताई फुंडकर यांच्यासह शेतकरी बांधव आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“ही बाजारपेठ परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. शेतमालाला योग्य दर मिळवून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदला वेळेत मिळण्यास या उपक्रमाची मदत होईल,” असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून उभारण्यात आलेली ही बाजारपेठ स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या शेतकरीहिताच्या विचारांना पुढे नेणारा उपक्रम ठरणार का, हे प्रत्यक्षातील व्यवहार, दरांची पारदर्शकता आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांवर अवलंबून असेल. मात्र, आधुनिक सुविधा आणि शेतकरीहिताचा दृष्टिकोन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या नव्या बाजारपेठेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.






