Home Breaking News Akola News : चार तासांत जबरी चोरीचा छडा; तिघे आरोपी जेरबंद

Akola News : चार तासांत जबरी चोरीचा छडा; तिघे आरोपी जेरबंद

खदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ₹१.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला (Akola News): खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवत मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला. या कारवाईत तिघा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली मोपेड व दोन मोबाईल असा एकूण ₹१ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

११ सप्टेंबर रोजी फिर्यादीला खदान पोलीस ठाणे परिसरात चार इसमांनी अडवून चाकूचा धाक दाखवला. तसेच थापडाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील ₹८ हजार रोख, ₹५ हजार किमतीची चांदीची चैन आणि फोन-पेच्या माध्यमातून ₹४,५००, असा एकूण ₹१७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून घेतला.

 

या प्रकरणी खदान पोलिसांनी अप.क्र. १४४७/२०२६, कलम ३०९(४), ३०९(६), ३(५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक भाउराव घुगे यांच्या आदेशानुसार खदान पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित किशोर जोशी (२४, रा. जेतवन नगर, खदान), शेख रिहान शेख राजीक (१९, रा. जेतवन नगर, खदान) आणि आर्यन ऊर्फ बिट्टू राजू धुर्वे (१८, रा. ख्रिश्चन कॉलनी, खदान) यांना ताब्यात घेतले.

 

मोपेड, मोबाईलसह ₹१.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून जबरी चोरीतील ₹१३ हजारांचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली अंदाजे ₹८० हजार किमतीची मोपेड तसेच ₹३० हजार किमतीचे दोन अँड्रॉईड मोबाईल, असा एकूण ₹१ लाख २३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 

आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Akola News

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाउराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गिरीश वीर, पोहेकॉ अमरसिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काटकर, राजेश वानखडे, निलेश बुंदे आणि स्वप्नील वानखडे यांनी केली, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख नितीन लेव्हरकर यांनी दिली.

Don`t copy text!