शाश्वत शेतीसाठी अनुकूल पाऊस-हवामानाची गणरायाला साकडे; कृषी तंत्रज्ञानासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश
श्रीकांत पाचकवडे
अकोला (Akola) : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणाला कृषी तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आगळावेगळा उपक्रम साकारला. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रायगड मुलांच्या वसतिगृहातील गणेशोत्सव मंडळात श्रीगणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली.
यावेळी कुलगुरू कर्नल प्रा. (डॉ.) शरद गडाख यांनी “बदलत्या हवामानाचे आव्हान दूर करण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानासोबत माती, पाणी आणि पर्यावरणाचे संवर्धन गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले. शाश्वत शेतीसाठी पोषक पाऊस आणि अनुकूल हवामान लाभावे, यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमाला कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. काळबांडे यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शरद गडाख व अधिष्ठाता डॉ. काळबांडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. गणपती बाप्पाच्या जयघोषाने वसतिगृह परिसर भक्तिमय झाला.
प्रगत शेतीचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण
गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले ते विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कृषीविषयक कार्यरत प्रतिकृतींचे प्रदर्शन.
यामध्ये—
शेतीचा विकास
कृषी फार्मस्टेड
कचऱ्यापासून संपत्ती
मातीपासून अंतराळापर्यंत
या संकल्पनांवर आधारित मॉडेल्स सादर करण्यात आली.
पारंपरिक शेतीपासून आधुनिक कृषी तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास, शेतीतील यांत्रिकीकरण, कचऱ्याचा पुनर्वापर आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती विद्यार्थ्यांनी कल्पकतेने मांडली.
कार्यरत मॉडेल्स ठरले आकर्षण
विद्यार्थ्यांनी गरम हवा भट्टी, वाहक पट्टा आणि पावसाचे पाणी साठवण व्यवस्था यांसारख्या कार्यरत प्रतिकृती तयार करून त्यांचे प्रात्यक्षिक दाखविले. कृषी अभियांत्रिकीच्या ज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोग प्रभावीपणे स्पष्ट केला.
वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणही केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून ‘हरित परिसर आणि सुरक्षित पर्यावरण’ याचा संदेश देण्यात आला.
भक्तीला विज्ञानाची जोड, गणेशोत्सवाला पर्यावरणाची साथ आणि तरुणाईच्या कल्पकतेतून प्रगत शेतीचा संदेश, अशी या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण सांगड घालण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.






