घरातून ५,२५० रुपयांची देशी दारू जप्त; १०५ क्वॉर्टर ताब्यात
कुशल भगत
अकोट : आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात दहीहांडा पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. हिंगणी बु. येथे घरातून सुरू असलेल्या कथित अवैध देशी दारूविक्रीवर पोलिसांनी छापा टाकत १०५ क्वॉर्टर दारू जप्त केली. या मुद्देमालाची किंमत ५,२५० रुपये आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राज गजानन आठवले (३६) हा हिंगणी बु. येथील राहत्या घरातून देशी दारूची विक्री करीत असल्याचा संशय होता. माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिस पथकाने संबंधित घराची झडती घेतली. यावेळी ‘देशी दारू खास संत्रा नं. ०९’ असे लेबल असलेले १०५ क्वॉर्टर आढळून आले.
प्रत्येक क्वॉर्टरची किंमत ५० रुपये असून, संपूर्ण जप्त मुद्देमालाची किंमत ५,२५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणी दहीहांडा पोलिस ठाण्यात अप. क्र. ४५७/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप तायडे (बकल नं. २४०१) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल डाभेराव (बकल नं. १९१९) करीत आहेत.
उत्सव काळात अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर
आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी दहीहांडा पोलिसांकडून अवैध दारूविक्रीसह इतर बेकायदेशीर व्यवसायांवर लक्ष ठेवले जात आहे. ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकांकडून संशयित ठिकाणी तपासणी व कारवाया सुरू आहेत.
अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, उत्सव काळात पोलिसांच्या गस्तीवरही भर राहणार आहे.






