अकोला दुष्काळाच्या उंबरठ्यावर; शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या
श्रीकांत पाचकवडे
अकोला : पावसाने पाठ फिरवल्याने अकोला जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने अनेक भागांतील पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके वाळण्याच्या अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी मदत व पीक नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी केली आहे.
यासंदर्भात पठाण यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निवेदनातून उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
पावसाच्या खंडाने खरीप धोक्यात
खरीप हंगामातील पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असताना पावसाने मोठी ओढ दिली आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उत्पादन घटण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे.
पावसाअभावी पिकांची झालेली अवस्था प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन तपासणे आवश्यक असल्याचे पठाण यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.
कागदोपत्री नव्हे, प्रत्यक्ष पंचनामे करा!
जिल्ह्यातील सद्यस्थितीची तातडीने पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे आणि आवश्यक सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाच्या खंडामुळे नेमके किती क्षेत्र बाधित झाले, कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले, याची प्रत्यक्ष पाहणी करून नोंद घेण्याची मागणी आहे.
दुष्काळ अथवा दुष्काळसदृश परिस्थितीचे निकष लागू होत असल्यास अकोला जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना दुष्काळी मदत, पीक नुकसानभरपाई तसेच आवश्यक सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पठाण यांनी केली.
*शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या निर्णयाकडे*
पावसाच्या लांबलेल्या खंडामुळे खरीप हंगामाचे भवितव्य अधांतरी आले आहे. पिकांचे उत्पादन घटल्यास शेतीचा खर्च, कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा आर्थिक भार कसा पेलायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता परिस्थितीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी आणि बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी आमदार साजिद खान मन्नानखान पठाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.






