श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरील प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेचे (IAS) युवा व कर्तव्यदक्ष अधिकारी अनय नावंदर यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
सध्या अनय नावंदर हे नाशिक विभागातील तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आदिवासी विकास, प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकाभिमुख कामकाजासाठी ओळख असलेल्या नावंदर यांच्याकडे आता अकोला जिल्हा परिषदेच्या कारभाराची धुरा सोपविण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार त्यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्या सल्ल्यानुसार अन्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून अकोला जिल्हा परिषदेत तातडीने रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
अकोला जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशा परिस्थितीत नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीकडे जिल्ह्यातील प्रशासकीय व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नावंदर यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनात कार्यक्षमतेसह विकासाभिमुख निर्णयप्रक्रियेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





