Home Breaking News मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर : नागपूर जिल्ह्यातील २५ प्रतिनिधी कर्जतला...

मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर : नागपूर जिल्ह्यातील २५ प्रतिनिधी कर्जतला रवाना होणार

मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर : नागपूर जिल्ह्यातील २५ प्रतिनिधी कर्जतला रवाना होणार

कुही : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ आणि ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कारांचे वितरण यंदा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे संपन्न होत आहे.

या दिमाखदार सोहळ्यासाठी नागपूर जिल्ह्यातून २५ पत्रकारांचा जत्था कर्जतला रवाना होणार असल्याची माहिती परिषदेचे विभागीय सचिव प्रदीप घुमडवार यांनी दिली आहे. ​​सन २०२५ चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार परभणी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर झाला असून नागपूर विभागातून बेला (जि. नागपूर) आणि चामोर्शी (जि. गडचिरोली) या दोन तालुका संघांना आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पत्रकार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ​​या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध विभागांतील ​नागपूर – बेला आणि चामोर्शी, ​नाशिक – नांदगाव-मनमाड, ​कोकण – पनवेल महानगर, ​पुणे – आंबेगाव, ​लातूर – किनवट, ​संभाजीनगर – अंबाजोगाई,​अमरावती -संग्रामपूर, ​कोल्हापूर – पलूस,​ मुंबई – मुंबई उपनगर आदी तालुका संघांना सन्मानित करण्यात येणार आहे. ​

दि.२२ फेब्रुवारीला कर्जत येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. यात नागपूर जिल्ह्याच्या पत्रकारांचा मोठा सहभाग राहणार आहे. ​या पुरस्कारांची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी केली आहे. या यशाबद्दल डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, राज्य महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, नागपूर विभागीय सचिव प्रदीप घुमडवार आणि इतर मान्यवरांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Don`t copy text!