कृत्रिम व नैसर्गिक गणेश घाटांवर प्रकाशयोजना, बॅरिकेडिंग, जीवरक्षक व वैद्यकीय पथकांची व्यवस्था करण्याचे महापौरांचे निर्देश
श्रीकांत पाचकवडे
अकोला : आगामी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौर सौ. शारदा रणजित खेडकर यांनी दिले आहेत. शहरातील नैसर्गिक तसेच कृत्रिम गणेश विसर्जन घाटांवर भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
विसर्जनाच्या वेळी भाविकांकडून अर्पण करण्यात येणाऱ्या निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गणेश घाटावर स्वतंत्र व सुस्थितीतील निर्माल्य वाहन उपलब्ध ठेवण्याचे विशेष निर्देश देण्यात आले आहेत. गणेशमूर्तींसोबत येणाऱ्या निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला आहे.
शहरातील सर्व विसर्जन घाट, प्रवेशद्वारे आणि विसर्जन कुंड परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश राहण्यासाठी उच्च क्षमतेचे फोकस लाईट्स तसेच जनरेटरची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी व तलाव परिसरातील नैसर्गिक घाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग, जीवरक्षकांची नियुक्ती आणि आपत्कालीन वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय घाट परिसरात कचरा व निर्माल्य साचणार नाही, यासाठी नियमित स्वच्छता करण्याबरोबरच गणेश विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आणि घाटांकडे जाणारे रस्ते खड्डेमुक्त व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाने काटेकोरपणे पार पाडावी, असे महापौरांनी स्पष्ट केले.
“गणेशोत्सव हा आपल्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे. विसर्जनादरम्यान कोणत्याही भाविकाला त्रास होणार नाही, तसेच शहराची स्वच्छता आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.”
अशा स्पष्ट शब्दांत महापौर सौ. शारदा रणजित खेडकर यांनी प्रशासनाला निर्देश देत, विसर्जन व्यवस्थेतील प्रत्येक बाबीचे नियोजन आणि अंमलबजावणी वेळेत करण्याचे आदेश दिले.






