Home विदर्भ शिवसेनेचा कृषिमंत्र्यांना थेट इशारा; जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजींच्या नेतृत्वात वाळलेली सोयाबीनची...

शिवसेनेचा कृषिमंत्र्यांना थेट इशारा; जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजींच्या नेतृत्वात वाळलेली सोयाबीनची रोपे दाखवत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

पावसाने शेतकरी उद्ध्वस्त; आता तरी अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर

श्रीकांत पाचकवडे

अकोला : पावसाने पाठ फिरवली, सोयाबीनसह सर्वच पिके करपली आणि शेतकऱ्यांच्या हातात आले केवळ नुकसानीचे ओझे!अकोला जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाच्या विळख्यात सापडला असताना शासन मात्र अद्याप ठोस मदतीपासून दूर असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अकोला जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, अशी आक्रमक मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

पावसाचा लपंडाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू!

 

यंदा वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी केलेला खर्च, घेतलेली मेहनत आणि भविष्यातील अपेक्षा पावसाच्या अनिश्चिततेमुळे धोक्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली.

 

शेतकऱ्यांना दररोज १२ तास वीजपुरवठा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ आठ तास वीजपुरवठा होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. आश्वासन १२ तासांचे, प्रत्यक्षात आठ तासांचे; मग शेतकऱ्यांनी शेती करायची तरी कशी? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने वीजप्रश्नावर शासनाला धारेवर धरले.

 

वाळलेली सोयाबीनची रोपे कृषिमंत्र्यांच्या हाती; शेतकऱ्यांची हतबलता उघड

शेतातील वास्तव परिस्थिती कागदोपत्री निवेदनापलीकडे नेण्यासाठी कुंभारी, बाबुळगाव आणि भौरद येथील शेतकऱ्यांनी वाळलेली व नुकसानग्रस्त सोयाबीनची रोपे थेट कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हाती सोपवली. करपलेल्या पिकांची रोपे दाखवत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

 

शेतकऱ्यांच्या अडचणी आणि विजेचा प्रश्न लक्षात घेऊन कृषिमंत्री भरणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले. या संदर्भात बैठक आयोजित करून प्रश्नावर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

 

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळावा, पिकांच्या नुकसानीची दखल घेतली जावी आणि वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडविला जावा, यासाठी शिवसेनेने शासनाकडे मागणी केली आहे. आता निवेदनानंतर प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकऱ्यांची उपस्थिती

 

या वेळी शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे, जिल्हाप्रमुख व माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे, सरपंच संघटनेचे महेंद्र गाढवे यांच्यासह विजय कराळे (बाबुळगाव), भौरद येथील शेतकरी गाढवे, रोहित डी. मालेकार (निंभी), हणमंत साहेबराव देशमुख (कुंभारी), अक्षय भगवान इंगळे (शिवणी), बाळकृष्ण तायडे, सचिन गोपाळराव बोराडे, जयंत वानखडे, समाधान गावंडे, सदाशिव चांदुरकर, दिगंबर बोर्डे, राजारत्न वानखडे, चंद्रकांत पठाणकर, रमेश सरदार, अनंता गावंडे, गजानन गावंडे, आकाश कांबळे, अजय मिसुरकार, सुरेंद्र मिसुरकार, रमेश खताळे, संतोष चव्हाण, वैभव उमापे, निलेश लोंढे, महेंद्र पायघन गाडगे, संतोष गावंडे, गणेश कराळे, सौ. सिंधू पवार आणि व्ही. पी. कराळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!