Home Breaking News गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अकोल्यात वाहतुकीत मोठे बदल

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अकोल्यात वाहतुकीत मोठे बदल

 

२५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबरपर्यंत प्रमुख मार्गांवर निर्बंध; अकोला–अकोट आणि अकोला–बाळापूर मार्गासाठी पर्यायी मार्ग निश्चित

 

श्रीकांत पाचकवडे

 

अकोला : श्री गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अकोला शहरासह अकोला–अकोट आणि अकोला–पारस फाटा–बाळापूर मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. याबाबत शहर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी माहिती दिली.

 

२५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत अकोला शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तर अकोला–अकोट तसेच अकोला–पारस फाटा–बाळापूर मार्गावर २५ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपासून २६ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतुकीतील हे बदल लागू राहणार आहेत.

 

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार हे वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

 

अकोला शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक वळविणार

 

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे डाबकी रोड, जुने शहर, श्रीवास्तव चौक, विठ्ठल मंदिर, अलका बॅटरी चौक, जय हिंद चौक, कोतवाली चौक, गांधी चौक, बसस्थानक परिसर तसेच संबंधित मार्गांवरील वाहतूक प्रभावित होणार आहे.

 

डाबकी रोड–जुने शहर येथून जाणारी वाहतूक भांडपुरा चौक–पोळा चौक–किल्ला चौक–हरिहरपेठ–वाशिम बायपास चौक–राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मार्गे लक्झरी बसस्थानक–जेल चौक–अशोक वाटिका–अकोला बसस्थानक या मार्गाने वळविण्यात येईल.

 

त्याचप्रमाणे अकोला बसस्थानकाकडून जाणारी वाहतूक अशोक वाटिका–जेल चौक–लक्झरी बसस्थानक–वाशिम बायपास–हरिहरपेठ–किल्ला चौक–भांडपुरा चौक–डाबकी रोड, जुने शहर या मार्गाने वळविण्यात येणार आहे.

 

रेल्वे ओव्हरब्रिजकडून अकोट स्टॅण्डकडे जाणारी वाहतूक रेल्वे स्टेशन चौक–अग्रसेन चौक–उड्डाणपूल–जेल चौक–लक्झरी बसस्थानक या मार्गाने वळविण्यात येईल.

 

लक्झरी बसस्थानकाकडून अकोट स्टॅण्डकडे जाणारी वाहतूक जेल चौक–उड्डाणपूल–अग्रसेन चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

 

सुभाष चौकाकडून गांधी चौकाकडे जाणारी वाहतूक दीपक कृषी केंद्र–दामले चौक–अग्रसेन चौक–टॉवर चौक अंडरपास या मार्गाने वळविण्यात येईल.

 

अकोला–अकोट मार्गावरही वाहतुकीचे नियोजन

 

अकोला–अकोट दरम्यानची वाहतूक तसेच दर्यापूरकडून अकोल्याच्या दिशेने येणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

 

अकोला बसस्थानक–अशोक वाटिका चौक–मेल चौक–लक्झरी बसस्थानक–वाशिम बायपास–शेगाव टी-पॉईंट–गायगाव–निंबा फाटा–देवरी–अकोट या मार्गाने अकोला–अकोट वाहतूक वळविण्यात येईल.

 

दर्यापूरकडून अकोल्याकडे येणारी वाहतूक अकोला बसस्थानक–टॉवर चौक–रेल्वे स्टेशन चौक–सातव चौक–न्यू तापडिया नगर–खरप टी-पॉईंट–म्हैसांग–दर्यापूर या मार्गाने वळविण्यात येणार आहे.

 

अकोला–पारस फाटा–बाळापूर–खामगाव मार्गावरही निर्बंध

 

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अकोला–पारस फाटा–बाळापूर–खामगाव मार्गावरील वाहतुकीसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

अकोला–पारस फाटा मार्गावरील वाहतूक हायवे ट्रॅप कार्यालयाजवळून बाळापूरच्या दिशेने वळविण्यात येणार आहे.

 

खामगाव–पारस फाटा–अकोला (वाशिम बायपास चौक)–पातूर या दिशेची वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. तसेच पातूरकडून बाळापूरकडे येणारी वाहतूक निर्धारित पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

 

पारस फाट्याजवळील रोषण ढाबा परिसरातून वाहतूक वळवून अकोला–खामगाव मार्गावरील तपे हनुमान मंदिराजवळील डिव्हायडर बॅरिकेडिंग पॉईंटपर्यंत वाहतूक नियमन करण्यात आले आहे.

 

वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

 

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी निर्धारित कालावधीत प्रतिबंधित मार्गांचा वापर टाळावा. वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी केले आहे.

Don`t copy text!